

विटा; पुढारी वृत्तसेवा : टेंभूच्या १०९ गावे आणि ४१ हजार हेक्टरच्या वाढीव विस्तारीत योजनेला मे अखेरपर्यंत सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत आमदार अनिल बाबर यांनी आज गुरुवारी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत तातडीने मान्यता द्या अशी मागणी केली होती. टेंभूच्या ६ वा टप्पा असलेल्या विस्तारीत योजनेच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेबाबत आमदार अनिल बाबर यांनी विधानसभेत गुरूवारी लक्षवेधी सूचना मांडली.
यावेळी आमदार बाबर म्हणाले, माझ्या मतदारसंघातील खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील टेंभूपासून वंचित गावांना पाणी मिळण्यासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री हे मागच्यावेळी मुख्यमंत्री असताना विनंती केली होती. त्यानंतर काही गावे वाढली. जत, सांगोला खटाव, माण अशा दुष्काळी तालुक्यातील माझ्या मतदारसंघाच्या लगत असणाऱ्या गावांचा समावेश करण्याची मागणी होती. या सर्वांचा समावेश होऊन योजना तांत्रिक मान्यता होऊन आता राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे म्हणजे एसएलटीसीकडे प्रस्ताव आला आहे. येत्या आठ दिवसात राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता होऊन पंधरा एप्रिलपर्यंत प्रशासकीय मान्यता व्हावी आणि निविदा प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आमदार बाबर यांनी केली.
त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, टेंभू योजना मागच्या काळात प्रधानमंत्री योजनेत समावेश करून जवळपास प्रमुख भाग पूर्ण केला आहे. त्यामुळे ८० टक्के सिंचन क्षमता वापरात देखील येत आहे. आता हा विस्तारीत योजनेचा भाग आहे. यामध्ये जवळपास १०९ गावे आणि ४१ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र येते. यासाठी २ हजार ४०० कोटी रूपये त्याकरीता लागणार आहेत. मागच्या काळात प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत आपण या योजनसाठी बंदिस्त पाईपलाईन पद्धत स्विकारली. त्यामुळे मुळ पाणी उपलब्ध होणार होते, त्यापेक्षा जास्त पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे पाणी शिल्लक राहत आहे. त्यामुळे आपण अतिरीक्त नवीन गावांचा समावेश त्यामध्ये केला आहे. तिसरी सुधारीत प्रशासकीय मान्यता मे अखेरपर्यंत होईल. एप्रिल महिना अखेरपर्यंत राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता होईल. त्यानंतर प्रशासकीय मान्यता होऊन मे अखेरपर्यंत निविदा प्रकिया होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
त्यामुळे आता खानापूर तालुक्यातील घोटी बुद्रुक, घोटी खुर्द, रेणावी, रेवणगाव, धोंडगेवा डी, घाडगेवाडी, ऐनवाडी, जाधववाडी, जखिन वाडी, भडकेवाडी, बाणूरगड, ताडाचीवाडी, कुसबावडे (अंशतः विटा गुंफा, सुळेवाडी, भिकवडी बुद्रुक, शेडगेवाडी) आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी, तरसवाडी, गुळेवाडी, पिंपरी बुद्रुक. पुजारवाडी (पांढरेवाडी),उंबरगाव, राजेवाडी, लिंगीवरे, आंबेवाडी, बोंबेवाडी, पिंपरी खुर्द (अंशतः पडळकरवाडी, कुरुंदवाडी, काळेवाडी, खांजोडवाडी) तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कल मधील विजयनगर कचरेवाडी किंदरवाडी,धोंडेवाडी, नरसेवाडी (अंशतः मोराळे, पेड, मांजर्डेदत्तनगर, पाडळी, धामणी, हातनोली, हातनूर) या टेंभूच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना फायदा होणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळामध्ये आपण मतदारांना जो शब्द दिला होता तो आज पूर्णत्वास येत असल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आमदार बाबर यांनी दिली आहे.
हेही वाचलंत का ?