सांगली : जतमध्ये बालविवाह प्रकरणी पतीसह, सासू-सासरे आणि आई-वडिलांवर गुन्हा दाखल

जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील एका गावात एका १६ वर्षीय मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, आई-वडील या पाचजणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पतीने वय कमी असल्याचे माहित असतानाही लग्न केले व शारीरिक संबंध ठेवल्याने वयाच्या १७ व्या वर्षी पीडित पत्नीने एका मुलीस जन्म दिला आहे. याप्रकरणी पती विरोधात (पोक्सो) बालअत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद संबंधित पीडित पत्नीनेच पती, सासू सासरे आई-वडील यांच्या विरोधात दिल्याने जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जत तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीचे लग्न ६ जून २०२२ रोजी करण्यात आले होते. पीडित मुलीचे वय कमी असल्याची कल्पना पती सासू-सासरे आई-वडील यांना होती. तरी देखील कायद्याचे उल्लंघन करून बालविवाह करण्यात आला. तसेच पतीने अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंध ठेवले त्यामुळे पीडित अल्पवयीन पत्नीने १९ मार्च २०२३ रोजी एका मुलीस जन्म दिला आहे. हा जन्म एका शासकीय रुग्णालयात झाला आहे. सदरची बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने याबाबतची माहिती त्यांनी पोलिसात दिली. त्यानंतर संबंधित पीडितीने पाच जणाविरुद्ध फिर्याद दिली आहे.
जत तालुक्यातील तिसरी घटना
शासनाने केलेल्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात अनेक बालविवाह होत आहेत. याबाबत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारची तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यास बालविवाहाची संख्या कमी होणार आहे.
अधिक वाचा :
- पैठण: संत एकनाथ साखर कारखान्याची २८ लाखांची फसवणूक : ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- सांगली: जत येथे टँकरच्या धडकेत दुचारीस्वाराचा जागीच मृत्यू
- Padma Awards 2023 : राष्ट्रपतींच्या हस्ते सुमन कल्याणपूर, कुमार मंगलम यांचा पद्म भूषण पुरस्काराने गौरव