सांगली: जवान गणपती भोसले अनंतात विलीन; डोंगरसोनीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | पुढारी

सांगली: जवान गणपती भोसले अनंतात विलीन; डोंगरसोनीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

तासगाव; पुढारी वृत्तसेवा: आसामच्या तेजपुर येथील १८१२ पायनियर युनिटचे जवान गणपती शंकर भोसले यांचे शनिवारी (दि.२८) अल्पशा आजाराने निधन झाले. यकृताच्या आजाराने ते ग्रस्त होते, पुणे येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर राहत्या गावी डोंगरसोनी येथील स्मशानभूमीत रविवारी (दि.२९) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील मान्यवर व्यक्तिंनी त्यांच्या पार्थिववावर पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली.

गणपती भोसले यांच्या निधनाची बातमी शनिवारी (दि.२८) समजताच गावावर शोककळा पसरली होती. रविवारी सकाळी अकरा वाजता गणपती भोसले यांचे पार्थिव डोंगरसोनी येथे आणण्यात आले. पार्थिव दारात येताच कुटूबिंयांनी हंबरडा फोडला. यावेळी ग्रामस्थांच्या अश्रूंचे बांध फुटले. सजवलेल्या ट्रॅक्टरमधून गावातून गणपती भोसले यांचे पार्थिव ग्रामपंचायत समोर आणले. याठिकाणी पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. ग्रामस्थांनी येथे पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत, त्यानंतर अंत्यविधीसाठी पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आले.

येथील राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, ताजुद्दीन तांबोळी, तासगावचे नायब तहसीलदार नागेश गायकवाड, सावळज मंडल अधिकारी वसंत पाटील, सरपंच राणीताई झांबरे, उपसरपंच किशोर कोडग, ग्रामपंचायत सदस्य अमित झांबरे, चंद्रकांत मोहिते, राजाराम झांबरे, ग्रामसेवक सुखदेव मोरे, तलाठी संदीप कांबळे यांच्यासह सैन्यातील अधिकारी, जवान यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. सैन्याच्या जवानांनी सलामी दिल्यानंतर त्यांच्या मुलाने पार्थिवास भडाग्नी दिला.

गणपती भोसले यांचा अल्पपरिचय

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गणपती भोसले यांनी आपले शिक्षण घेतले होते. दहावीपर्यंतचे शिक्षण डोंगरसोनी हायस्कूल मध्ये घेतले. नंतर ते भारतीय सैन्यदलात भरती झाले. ते एक चांगले चित्रकार होते. भरती होण्यापूर्वी गावात गणेश पेंटर नावाने परिचित होते. विविध पेंटिंगच्या माध्यमातून आपली कला जोपासली होती. गावात हनुमान मंदिरातील भिंतीवर त्यांनी साकारलेली गणेश, शंकर, श्रीराम आणि हनुमानाची तैलचित्रे आहेत. अत्यंत शांत, मनमिळावू स्वभावाच्या गणपती यांनी मोठा मित्र परिवार जोडला आहे.

हेही वाचा:

Back to top button