सांगली : गिरगाव येथे मित्रानेच केला धारधार शस्त्राने खून | पुढारी

सांगली : गिरगाव येथे मित्रानेच केला धारधार शस्त्राने खून

जत; पुढारी वृत्तसेवा : गिरगाव (ता. जत) येथे मित्रानेच आपल्या मित्राचा काटा काढल्याची घटना उघडकीस आली आहे. गावाकडून सेंट्रींग कामासाठी बोलवून घेतलेल्या मित्राच्या पोटात धारदार शस्त्र भोकसून खून केला आहे. महादेवाप्पा राजशेखर हिरेमठ (वय. ३५,रा. विजयपूर पेठ, ता. जि. विजयपूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता घडली आहे. याबाबतची फिर्याद प्रशांत चंद्रकांत हिरेमठ यांनी उमदी पोलिसात दिली आहे. संशयित आरोपी दत्ता बंजत्री यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी बजंत्री फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, विजयपूर येथील महादेवाप्पा हिरेमठ पाण्याच्या टाकीचे काम करण्यासाठी त्याचा मित्र दत्ता यल्लाप्पा बजंत्री सोबत शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता गिरगाव येथे आला होता. दरम्यान, गिरगाव येथे दोघेही कामावर आले होते. हिरेमठ व त्याचा मित्र बजंत्री या दोघांच्यात किरकोळ वाद झाला. बजंत्री याने या वादातूनच रात्री अकरा वाजता महादेवाप्पा याला धारदार शस्त्राने पोटात भोकसले. त्यानंतर घटनास्थळावरुन पलायन केले आहे.

रात्री उशिरा घटना उमदी पोलिसांना समजली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट दिली व आरोपी दत्ता बंजत्री याच्या शोधासाठी पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे एक पथक विजयपूर येथे पाठवले आहे. या घटनेने गिरगाव येथे खळबळ उडाली आहे. आरोपी बजंत्री याच्यावर विजापूर जिल्ह्यात मारामारी, चोरी, धमकावणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समजते.

हेही वाचा

 

Back to top button