सांगली : आटपाडीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून १.२७ कोटींची फसवणूक | पुढारी

सांगली : आटपाडीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून १.२७ कोटींची फसवणूक

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून लोकांची फसवणूक करणाऱ्या ट्रेडर्स पैकी व्ही.एच.एस ट्रेडर्स आणि एल.एल.पी या कंपनीच्या ढेमरे बंधू आणि दोघांवर १ कोटी २७ लाखांचीआर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

आटपाडी येथील या कंपनीने फसवणूक केल्याबद्दल कवठेमहांकाळ येथील गिरीश सुकुमार कोठावळे (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ऑगस्ट २०२१ दरम्यान कोठावळे यांना गदिमा पार्क आटपाडी येथील व्ही.एच.एस ट्रेडर्स आणि एल.एल.पी कंपनी मार्फत शेअर्स मार्केट मध्ये ट्रेडींग करुन गुंतवणुकदारांना दरमहा १० टक्के परतावा देत असल्याचे सांगून कंपनीत १ कोटी १८ लाख ९५ हजार रुपये बँक खात्याद्वारे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले.

यावेळी कंपनीने कोठावळे यांना गुंतवणूक रक्कमेच्या सुरक्षेसाठी कंपनीने १ कोटीचा धनादेश आणि ३ लाखाची पैसे भरल्याची पावती दिली. गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर कंपनीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. त्यामुळे कोठावळे यांनी विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.

कोठावळे यांच्याप्रमाणे साक्षीदार रोहन रामलिंग पाटणे (रा.आटपाडी) यांची ३ लाख ६० हजार रुपये आणि अमर महारुद्र हेकणे (रा.आटपाडी) यांची ४ लाख ७५ हजार रुपयांची कंपनीने फसवणूक केली आहे. या दोघांची मिळून ९ लाखाची गुंतवणूक केली. त्यापैकी कंपनीने त्यांना ६५ हजार रुपये परत दिले. त्यांची ८ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

त्यामुळे कंपनीने कोठावळे आणि दोन साक्षीदारांची त्यांची एक कोटी २७ लाख ३० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी संदीप धोंडीराम ढेमरे, संतोष धोंडीराम ढेमरे, विनोद दादासो कदम आणि हरूण इस्माईल तांबोळी या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

सांगली आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर पाटील आणि पथकाने याप्रकरणी आज सखोल चौकशी केली. गदिमा पार्क मधील व्ही.एच.एस. कंपनी कार्यालयाची झडती घेण्यात आली. सर्व आरोपीच्या कुटुंबियांकडे देखील चौकशी झाली.

दरम्यान शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन सुधीर पाटील यांनी केले आहे.

अधिक वाचा :

Back to top button