विट्यातील नागरिकांच्या सेवेत कापडी पिशव्यांचे एटीएम; पर्यावरण चळवळीला बळ | पुढारी

विट्यातील नागरिकांच्या सेवेत कापडी पिशव्यांचे एटीएम; पर्यावरण चळवळीला बळ

विटा; पुढारी वृत्तसेवा : विट्यात प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे एटीएम्स शहरातील विविध ठिकाणी बसविले आहेत. त्यामुळे विटेकरांनो आपणही पर्यावरणमित्र बना, असे आवाहन प्रशासक तथा प्रांताधिकारी संतोष भोर यांनी केले आहे.

विटा पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून पर्यावरण संवर्धन, प्रदूषणाला आळा बसावा या उद्देशाने पालिका, सीएफसी शेजारी, भाजी मंडई अशा विविध सार्वजनिक आणि व्यापारी भागात हे कापडी पिशव्यांची एटीएम बसविण्यात आले आहेत. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील पहिले कापडी पिशव्या एटीएम मशीन्स विट्यात बसवण्यात आले आहेत. ही सुविधा सर्व नागरिकांसाठी खुली आहे. या कापडी पिशवी एटीएम केंद्राचे उदघाटन प्रशासक तथा प्रांताधिकारी संतोष भोर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भोर म्हणाले, “नागरिकांनी जास्तीत जास्त कापडी पिशवीचा वापर करावा. विटा शहर स्वच्छतेसोबतच प्लास्टिक मुक्त होण्यास मदत म्हणून प्लास्टिक पिशव्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत विटेकर जागरूक आहेत. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय मिळाल्या शिवाय वापर थांबणार नाही, हा विचार करून रास्त दरात कापडी पिशव्या उपलब्ध मिळवून देणारे एटीएम बाजारपेठेत बसविण्यात आले आहे. पाच रुपये इतक्या कमी किंमतीत विटेकरांना कापडी पिशव्या मिळणार आहेत.

विटा शहरात प्लास्टिक कचरामुक्तीची चळवळ जोर धरू लागली असून सदर उपक्रमास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष डोके, बळवंत कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, उपमुख्याधिकारी स्वप्निल खामकर, स्वच्छता निरीक्षक आनंदा सावंत, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि अन्य नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा :

Back to top button