अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता नंदा बारामतीत, पवार कुटुंबीयांच्या निमंत्रणावरून विविध प्रकल्पांना भेट | पुढारी

अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता नंदा बारामतीत, पवार कुटुंबीयांच्या निमंत्रणावरून विविध प्रकल्पांना भेट

बारामती, पुढारी वृत्तसेवा: प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता नंदा या त्यांच्या मैत्रिणींसह बारामती दौऱ्यावर आल्या आहेत. विशेष विमानाने त्या बारामतीत दाखल झाल्या. पवार कुटुंबीयांच्या निमंत्रणावरून त्या बारामतीत आल्या असून, येथील विमानतळावर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे स्वागत केले. शुक्रवारी (दि. २७) त्या बारामतीत आल्या आहेत.

श्वेता यांच्यासमवेत उद्योजिका तानिया गोदरेज आणि त्यांच्या अन्य तीन मैत्रिणी देखील आहेत. बारामतीत त्यांनी सुरुवातीला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, उपअधिष्ठाता डॉ. अंजली शेटे, अधीक्षक डॉ. उदय राजपूत, डॉ. सौरभ मुथा यांनी त्यांना बालरोग विभाग आणि अन्य वैद्यकीय कामकाजाची माहिती दिली. खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे, बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव या वेळी त्यांच्यासोबत होते.

त्यानंतर श्वेता यांनी एमआयडीसीतील विविध प्रकल्प आणि कंपन्यांसह कृषी विकास प्रतिष्ठानच्या अटल इन्क्युबेशन सेंटरसह विविध प्रकल्पांची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून त्यांचे स्वागत केले. या वेळी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या. सायंकाळी त्यांनी हुरडा पार्टीचा आनंद घेतला. शुक्रवारी रात्री शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी रात्री मुक्कामी थांबल्या.

शनिवारी (दि. २८) श्वेता नंदा यांनी कृषी विज्ञान केंद्रातील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. खासदार सुळे, अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आदींसमवेत त्यांनी भेट देत माहिती घेतली. त्यानंतर सायंकाळी त्या मुंबईला रवाना झाल्या. श्वेता या खासदार सुळे यांच्या मैत्रीण आहेत. श्वेता यांचा हा खासगी दौरा असल्याचे समजते.

Back to top button