सांगली : विटा शहरातील भुयारी गटार योजनेचे काय झाले ? : विरोधकांचा सत्ताधाऱ्यांना सवाल | पुढारी

सांगली : विटा शहरातील भुयारी गटार योजनेचे काय झाले ? : विरोधकांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

विटा : पुढारी वृत्तसेवा : विट्यातल्या भुयारी गटार योजनेचे काय झाले ? असा सवाल करत माजी नगरसेवक अमोल बाबर आणि अनिल बाबर यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. निवडणुका आल्या की, आपले गाव असे करू तसे करू, अशा घोषणा करणारे सिंगापूर करू, असे म्हणतात, प्रत्यक्षात काय घडलंय ? अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

विटा पालिकेची आगामी निवडणूक शिंदे गट, भाजप आणि मित्र पक्ष असे एकत्रित लढवणार आहेत. शहर विकासाच्या या युतीच्या काय कल्पना आहेत, त्या कशा पूर्ण करणार आहेत, याबाबत माजी नगरसेवक अमोल बाबर आणि भाजप शहराध्यक्ष अनिल बाबर यांनी सविस्तर माहिती दिली.

ते म्हणाले की, विटा शहरातील नागरिकांचा एकूण मानस बघितला. तर सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला ते कंटाळलेले आहेत. आता फक्त आम्ही सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आमच्या युतीस सत्ता दिली. तर सर्वांत प्रथम लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यासाठी संबंधित ट्रस्टशी समन्वय साधून लवकरात लवकर तो पुतळा उभा करणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ही पुतळा उभारणार आहे.

भुयारी गटारी योजनेच्या सत्ताधाऱ्यांच्या केवळ वल्गना

शहरासाठी गलाई व्यावसायिकांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ मुस, भट्टी आदीच्या प्रतिकृती योग्य ठिकाणी उभारणार आहे. दररोज पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. पाणीपट्टी कमी करण्याची हमी देत आहे. आजपर्यंत भुयारी गटारी योजनेसाठी सत्ताधारी अनेक वेळा वल्गना केल्या. परंतु त्यांनी प्रयत्न केले असतीलही पण किती यश आले हे आपण पाहतोच. खासदार संजय पाटील, आमदार अनिलराव बाबर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून आम्ही योजना पूर्ण करू. शहरासाठी अत्यावश्यक असे रिंगरोड, बटरफ्लाय गार्डन, कॅक्टस गार्डन तयार करणार आहोत. सभागृहाला जे अधिकार आहेत. त्याचा उपयोग करून गुंठेवारी कायम स्वरूपी चालू ठेवू. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर करून वेळेत अनुदान मिळवून देणार आहे.

विटा शहरात अत्यंत दर्जेदार ५० कोटींहून अधिकची कामे आम्ही केली आहेत. अजूनही काही कोटींची कामे प्रस्तावित आहेत. लवकरच शहरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा भव्य कार्यक्रम घेणार आहे. ढवळेश्वर तलाव सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे, तेही काम लवकर पूर्ण करणार आहे. शासनाची जागा शहरात मिळाल्यास जागा मिळताच दोनच दिवसांत नाट्यगृहासाठी निधी मिळवून देवू, असेही माजी नगरसेवक बाबर यांनी सांगितले.

माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी श्रीधर जाधव, कृष्णात गायकवाड, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, विटा शहर शिवसेना प्रमुख राजू जाधव, कन्हैय्या पवार, दत्तात्रय तारळेकर, किशोर डोंबे, शरद होगले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button