सांगलीत आठही आमदार भाजपचे असतील : पालकमंत्री सुरेश खाडे

सांगलीत आठही आमदार भाजपचे असतील : पालकमंत्री सुरेश खाडे
Published on
Updated on

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा :  देशात, राज्यात, जिल्ह्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपची घोडदौड सुरू राहणार आहे. सांगली जिल्ह्यातील आठही आमदार भाजपच्या विचारांचे असतील, असे मत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केले. येथील भाजपचा मेळावा आणि नूतन सरपंच, सदस्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, सरचिटणीस मिलिंद कोरे उपस्थित होते.

ना. खाडे म्हणाले, सांगली जिल्ह्याच्या तिजोरीची चावी माझ्याकडे आहे. जिल्ह्यातील मॉडेल स्कूल, स्मार्ट पीएचसीसाठी, केंद्र सरकारच्या जलमिशन योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आ. जयंत पाटील हे १६ वर्षे मंत्री होते. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ते पेठ-सांगली रस्त्यावरून जात होते. तरीही त्यांनी या रस्त्यासाठी निधी आणला नाही. भाजपने पेठ-सांगली रस्त्यासाठी ८८२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या रस्त्याच्या कामाची सुरुवात लवकरच करण्यात येणार आहे.

ते म्हणाले, जिल्ह्यातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपकडून जनता दरबार भरविला जाणार आहे. तेथे ऑन दि स्पॉट जनतेच्या समस्या सोडविणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती झाले पाहिजेत.

खा. संजय पाटील म्हणाले, मी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये निशिकांत पाटील यांच्या पाठीशी राहणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेशी युती केल्याने राज्यात सर्वत्र भाजपचे नुकसान झाले आहे. शिवसेनेने विश्वासघात केला. तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी स्वागत केले. निवास पाटील यांनी आभार मानले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मधुकर हुबाले, सुरेखा जगताप, अशोकराव खोत, संदीप सावंत, संजय हवलदार, राहुल पाटील, संतोष घनवट उपस्थित होते.

त्यांचा कार्यक्रम त्याच भाषेत करू…

जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात संघर्ष आमच्या पाचवीला पूजला आहे. या मतदारसंघात पक्षाने आम्हाला आणखी ताकद दिली पाहिजे. आ. जयंत पाटील यांच्याकडून आम्हाला, आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. त्यांचा कार्यक्रम त्याच भाषेत केला जाईल. २०२४ मध्ये इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचाच आमदार असेल. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही वादळात दिवा लावला आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि आघाडीचे एकूण १८ सरपंच, १५९ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news