'छोटे' मासे गळाला 'बडे' मोकाटच; गांजा तस्करीचे सांगली बनलेय केंद्र ! | पुढारी

'छोटे' मासे गळाला 'बडे' मोकाटच; गांजा तस्करीचे सांगली बनलेय केंद्र !

सांगली : सचिन लाड : गेल्या दोन महिन्यांपासून गांजा पकडण्याची सातत्याने कारवाई होत असल्याने सांगली तस्करीचे मुख्य केंद्र बनले आहे. परजिल्ह्यातील तस्करांनी सांगलीत शिरकाव केला आहे. त्यांना स्थानिक गुन्हेगारांची ‘रसद’ मिळत असल्याने तस्करीचा हा बाजार जिल्हाभर पसरला आहे. आतापर्यंतच्या कारवाईत ‘छोटे’ मासेच गळाला लागले आहेत. ‘बडे’ अजुनही मोकाट असल्याने तस्करीचा हा धंदा खूपच जोमात सुरू आहे.

आंध्र प्रदेश, कर्नाटक, पुणे या भागातून गांजाची तस्करी सुरू आहे. सांगलीत तस्करीचे मुख्य केंद्र बनविण्यात आले आहे. त्यानंतर या गांजाचा जिल्हाभर पुरवठा केला जात आहे. तरुणांची पिढी गांजाच्या आहारी गेल्याचे गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्ह्यांवरून दिसून येते. अवघ्या दीडशे ते दोनशे रुपयांना एक पुडी मिळते. एकदा गांजाचे सेवन केले २४ तास त्याची नशा राहते. माव्यामध्येही गांजाचे पाणी घातले जाते. नशेखोरांनी गांजा ओढवण्यासाठी आडमार्गावर अड्डेच तयार केले आहेत. शाळा, महाविद्यालय, मंदिरे, नदीकाठ या ठिकाणीही आडोशाला गांजाचे अड्डे बनविले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने गांजा जप्त करण्याची कारवाई होत आहे. नांद्रे (ता. मिरज) येथे तर किराणा मालाच्या दुकानातून गांजा विक्री केली जात होती. मिरजेतही पान दुकानातून गांजा जप्त केला होता. बेळंकी (ता. मिरज) येथे गांजाची शेतीच सापडली. दोन दिवसापूर्वी मुचंडी (ता. जत) येथील गांजाच्या शेतीवर छापा टाकण्यात आला. तत्पूर्वी गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्यातील दोघांना सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावर दोघां तस्करांना पकडले. कर्नाटकातील दोन तस्करांना गांजा विक्री करणाऱ्यांना पकडले. सातत्याने गांजा सापडत असल्याने सांगलीत तस्करीचे मुख्य केंद्रच बनविण्यात आले आहे. स्थानिक गुन्हेगारांची रसद या तस्करांना मिळत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

रेल्वेतून तस्करी : मिरजेतून मग सांगलीत

कर्नाटकातील तस्कर रेल्वेतून खुलेआम गांजाची तस्करी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या महिन्यात कर्नाटकच्या दोन तस्करांना सांगलीत पकडले. त्यांच्याकडून २८ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. त्यांच्याकडे कर्नाटक ते मिरज रेल्वे प्रवासाचे तिकीट सापडले. मिरजेत गांजा विकून ते सांगलीत आले होते.

उपनगरामध्ये गांजा विक्रीचे अड्डेच !

शहरातील उपनगरामध्ये गांजा विक्रीचे अड्डेच आहेत. दीडशेची पुडी आता दोनशे रुपयाला विकली जात आहे. विक्री करणारी मोठी साखळी आहे. या साखळीतून गेले तरच गांजा विकत मिळतो. मिरज, कुपवाडमध्येही विक्री करणाऱ्या पाच ते सहा टोळ्या आहेत. सांगलीत ‘डी’ नामक गँगकडून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना लागली आहे.

Back to top button