Jayant Patil Tweet : या…’सरकार’ विरोधात लढत राहणार – जयंत पाटील  | पुढारी

 Jayant Patil Tweet : या...'सरकार' विरोधात लढत राहणार - जयंत पाटील 

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नेते जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करत  म्हंटल आहे की, “या निर्लज्ज ‘सरकार’ विरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय…!” वाचा सविस्तर बातमी. (Jayant Patil Tweet )

Jayant Patil Tweet : काय म्हणाले होते जयंत पाटील

विधीमंडळाचे अधिवेशन सोमवार (दि.१९) पासून सुरु आहे. काल अधिवेशनाचा चौथा दिवस. दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी सभागृहात प्रचंड गदारोळात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी जाहीर केली. त्यामुळे विरोधकही आक्रमक झाले. त्यांनी बोलण्याची परवानगी मागितली. शिवसेना सदस्य भास्कर जाधव हे बोलण्याची परवानगी मागत होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना बोलण्याची परवानगी दिली नाही. त्यावर आक्षेप घेत जयंत पाटील यांनी विरोधकांना अध्यक्ष बोलू देत नाहीत, असे सांगत तुम्ही असला निर्लज्जपणा करू नका, असे अध्यक्षांना सुनावले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड संतापले. त्यांनी जयंत पाटील यांना आताच्या आता निलंबित करा, अशी मागणी केली. त्यावेळी उडालेल्या गदारोळात सभागृहाचे कामकाज तीन वेळा दीड तासासाठी तहकूब करण्यात आले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची दिलगिरी

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा ठराव मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर जयंत पाटील यांच्याकडून अनावधानाने हा शब्द गेल्याचे सांगत झाल्या प्रकाराबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. अध्यक्षांबद्दल आमच्या मनात आदरच आहे. कोणताही गैरसमज होऊ नये, असे सांगत अजित पवार यांनी हे निलंबन मागे घेण्याबाबत विचार व्हावा, अशी विनंतीही केली. त्यानंतर कोणत्याही चर्चेविना पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

हेही वाचा

Back to top button