

अशोक मोराळे
पुणे : 'मैं सिन्सियर और सिधा आदमी हूँ । मैं सिधा काम करता हूँ। आप लोग भी सिधाही काम करो। कोई तेढा काम करेगा ओ मुझे पसंद नहीं । जो मैं करता हूँ सामनेसे करता हूँ,' अशा शब्दांत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांना पहिल्याच आठवडा आढावा बैठकीत (डब्लूआरएम) सज्जड इशारा दिला. आयुक्तांचा पवित्रा पाहून अधिकार्यांनी धसका घेतल्याची चर्चा आहे.
गुरुवारी (दि.22) सकाळी शहर पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, सर्व परिमंडळाचे पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त उपस्थित होते.
काम करत असताना मला संवाद आवडतो. तुमच्या काही सूचना असतील, तर त्यादेखील विचारात घेतल्या जातील. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणून काम करत असताना, जबादारीने काळजीपूर्वक काम करावे लागेल. कोणतेही काम दबावात करता कामा नये. कामात गैरमार्ग अवलंबलेला सहन केला जाणार नाही, त्याची वेळीच गंभीर दखल घेतली जाईल.
प्रभारी अधिकारी म्हणून एकदा जबाबदारी घेतल्यानंतर कामात हयगय खपवून घेतली जाणार नाही. ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या प्रत्येकाची गांभीर्याने दखल घ्या, विशेषत: महिलांच्या संदर्भातील तक्रार अर्ज प्रलंबित ठेवू नका. घटनेचे गांभीर्य पाहून तत्काळ गुन्हे दाखल करा. मी प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा करत असतो, त्यामुळे तुम्हीदेखील तसेच काम करा, असेदेखील बैठकीत रितेश कुमार म्हणाले.
आयुक्तसाहेब, जरा हे पण पाहा..
नागरिक तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात गेल्यानंतर दिलासा मिळण्याऐवजी, 'येथे जा..तेथे जा..'असे सांगत पळवाटा काढल्या जातात. अनेकदा नाइलाजास्तव तक्रारदारांना न्यायालयाची पायरी चढावी लागते. प्रसंगी वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. एकीकडे वरिष्ठ अधिकार्यांकडून तक्रार अर्ज प्रलंबित ठेवू नका, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात काही पोलिस ठाण्यातील परिस्थिती वेगळीच आहे. एखाद्या तक्रारअर्जाबाबत तक्रारदाराने अनेकदा तपास अधिकार्याशी संवाद साधूनसुद्धा त्याला दाद दिली जात नसल्याचे चित्र आहे. परंतु, अर्थपूर्ण तक्रार अर्जांची दखल तत्काळ घेतली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आयुक्तांच्या इशार्यानंतर याबाबत बदल होतो की नाही हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
नागरिकांसोबत व्यवस्थित संवाद ठेवा…
पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन येणार्या नागरिकांसोबत तेथील कर्मचार्यांनी व्यवस्थित संवाद ठेवला पाहिजे. त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्या. गुन्ह्याचा आलेख वाढला, तरी चालेल पण तक्रारींचा निपटारा झाला पाहिजे. तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना चकरा मारायला लावू नका, असेदेखील त्यांनी बैठकीत सांगितले.
शहरात गुन्हेगारी वाढता कामा नये
पुणे हे शांत शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे तेथे गुन्हेगारी वाढता कामा नये. प्रामुख्याने रस्त्यावर (स्ट्रीट क्राईम) घडणारे गुन्हे जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, मोबाईल हिसकावणे अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी युद्धपातळीवर उपायोजना करा. हे गुन्हे घडता कामा नये. घरफोडी, वाहनचोरी या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिस ठाण्याची पथके काम करतील. गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. त्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, असेही त्यांनी सांगितले.
गोळीबार, तोडफोडीच्या घटनांना आळा
गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये कोयत्यांचा सर्रास वापर होतो आहे तसेच गोळीबाराच्या (फायर आर्म) घटनांमध्येदेखील वाढ होताना दिसते आहे. चालू महिन्यात अनेक घटना घडल्या आहेत. त्या घटनांना तत्काळ प्रतिबंध करण्यासाठी उपायोजना करा. नव्याने गुन्हेगारी जगतात पाय ठेवू पाहणार्या (रायझिंग स्टार) तरुणांना आळा घाला. प्रसंगी कायद्यानुसार कठोर कारवाई करा, असेदेखील रितेश कुमार यांनी सांगितले.