Gram Panchayat Election 2022 : सांगली- पलूसमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन प्रचार, जेवणावळीचा सपाटा; राजकीय चुरस वाढली | पुढारी

Gram Panchayat Election 2022 : सांगली- पलूसमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन प्रचार, जेवणावळीचा सपाटा; राजकीय चुरस वाढली

पलूस (जि. सांगली); तुकाराम धायगुडे : पलूस तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन प्रचार व मतदारांना खुश करण्यासाठी जेवणावळीचा सपाटा लावल्याचे चित्र सध्या सगळीकडे दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीची राजकीय चुरस वाढली झाली आहे. ग्रामपंचायतीचे मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक राहिल्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. पूर्वी सरपंच हा निवडून आलेल्या उमेदवारांमधून निवडला जायचा. आता सरपंच पद हे जनतेमधून असल्याने सरपंच उमेदवाराला संपूर्ण गावात (Gram Panchayat Election 2022) घरोघरी फिरून प्रचार करावा लागत आहे. दिवसभर मतदारांच्या गाठीभेटी घेणे, वडीलधारांच्या पाया पडणे यामुळे सरपंच उमेदवार थकल्याचे दिसून येत आहेत.

Gram Panchayat Election 2022 : प्रचाराची पद्धत बदलली

उमेदवारांची पत्रके घेऊन लहान मुले घरोघरी वाटत आहेत, कार्यकर्ते वस्तीवस्तीत फिरत आहेत. प्रत्यक्ष साहित्य वाटपाऐवजी ऑनलाइन प्रचार करण्यावर उमेदवारांचा भर अधिक असल्याचे दिसत आहे. उमेदवाराचे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचणे. त्यांना पत्रके व जाहीरनामा देणे यांचा आधार घेतला जात आहे. त्याखेरीज उमेदवाराचे चिन्ह असलेले झेंडे, टोप्या घालून कार्यकर्ते प्रचार करीत आहेत. एकूणच प्रचाराची पद्धत बदलल्यामुळे, खर्चाची मर्यादा आल्याने व आधुनिक स्वरूपाच्या स्क्रिन ऑनलाइन प्रचारावर अधिक खर्च केला जात आहे. त्यामुळे प्रचाराची जुनी पद्धत आज दिसून येत नाही.

‘ऑनलाइन धुमश्चक्री’

निवडणुकांमध्ये दोन पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, मारामारी नवीन नाही. मात्र आता सोशल मीडियावर चाललेली ‘ऑनलाइन धुमश्चक्री’ युवा मतदारांचे मनोरंजन व करमणूक ठरत असल्याचे दिसत आहे. फेसबुकवर तर अशा प्रकारच्या पेजेसच सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बनविले आहेत. विरोधातील उमेदवाराचे जुन्या काळातील आश्वासनांचे व्हिडीओ, कात्रणे शोधून त्यांच्या मदतीने मिम्स बनवून ‘तो उमेदवार चुकीचा ‘ हे मतदारांच्या मनावर बिंबवायचे प्रकार दिसून येत आहे.

पूर्वी फक्त विधानसभा निवडणुकीसाठी मोबाइलवर ऑनलाईन क्लिप तयार करण्यासाठी दिसत होत्या .परंतु ग्रामपंचायतीसाठी काही एजन्सी कार्यरत आहेत. या एजन्सींकडे उमेदवाराच्या प्रभागातील विविध गटांतील, वस्त्यांमधील मोबाइल क्रमांकांची यादी गोळा करीत त्या मोबाइल क्रमांकांवर एकगठ्ठा मेसेज धाडले जात आहेत. व्हॉट्स अॅपवर एकगठ्ठा ती क्लिप धाडली जात असून ती पुढे ती व्हायरल करताना कार्यकर्ते दिसत आहे.

Gram Panchayat Election 2022 : जेवणावळीचा सपाटा

मतदारांना खुश ठेवण्यासाठी ढाबे, हॉटेल आता गर्दीने फुललेले दिसत आहे. काही उमेदवारांनी ठराविक हॉटेल बुक केली असून कुपन पद्धत सुरू केली आहे. तसेच वार्डावार्डात देखील मतदारांना मांसाहारी जेवण देताना दिसत आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच उमेदवारांनी जेवणावळीचा सपाटाच लावला असून मतदान होईपर्यंत हे सत्र सुरूच राहणार आहे.

ऑनलाईनमुळे प्रचार साहित्य विक्रीत ५० टक्क्यांची घट 

पूर्वी निवडणुकीसाठी झेंड्याचा, बिल्ल्यांचाही वापर केला जायचा. परंतु स्क्रिन ,मोबाईल ऑनलाईनमुळे निवडक कार्यकर्ते व उमेदवार वगळल्यास कोणीही गमछ्याचा व झेंड्याचा वापर करताना दिसत नाही. बिल्ले तर वापरले जातच नाहीत. आधी एकेक उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने गमछे घेऊन जायचे. त्यामुळे या प्रकारच्या साहित्याची विक्री ५० टक्क्यांनी घटल्याचे येथील व्यापारी बोलत आहेत.

हेही वाचा

Back to top button