पुणे : साहित्यिकांचे राजीनामासत्र सुरूच; लक्ष्मीकांत देशमुख यांनी अध्यक्षपदाचा दिला राजीनामा | पुढारी

पुणे : साहित्यिकांचे राजीनामासत्र सुरूच; लक्ष्मीकांत देशमुख यांनी अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाला दिलेला पुरस्कार राज्य सरकारने रद्द केल्यानंतर साहित्यिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे. राज्य सरकारच्या विविध समित्यांवर काम करणार्‍या साहित्यिकांचे राजीनामासत्र बुधवारीही (दि. 14) कायम होते. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुरस्कार रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. विवेक घोटाळे यांच्यासह राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद शिरसाठ यांनीही राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.

त्याचबरोबर डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे मंगळवारीच जाहीर केले असून, ‘वैचारिक घुसळण’चे लेखक आनंद करंदीकर, ‘भुरा’चे लेखक शरद बाविस्कर यांनीही आपल्या पुस्तकासाठी जाहीर झालेले पुरस्कार नाकारत असल्याचे जाहीर केले आहे.

पुस्तकाला जाहीर झालेला राज्य सरकारचा पुरस्कार पुन्हा सन्मानाने बहाल करावा, अशी मागणी करीत भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मराठी भाषामंत्री दीपक केसरकर आणि प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना ई-मेल करून राजीनामा दिला आहे. ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे पुस्तक मी वाचले असून, त्यात आक्षेपार्ह काही नाही, असे लेखक म्हणून माझे मत आहे. मूळ इंग्रजी पुस्तकात आणि मराठी अनुवादात नक्षलवादाचे उदात्तीकरण आणि हिंसेचा पुरस्कार लेखकाने केलेला नाही. या पुस्तकावर केंद्र किंवा राज्य सरकारने आजवर बंदी घातलेली नसून, ते दोन वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहे.

त्याचा मराठी अनुवादही सहा महिन्यांपासून राज्यभर विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच, हा पुरस्कार मूळ पुस्तकाला नाही, तर उत्तम अनुवादाला असतो. त्यामुळे पुरस्कार रद्द करण्याची कृती केवळ अनुचितच नाही, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मौलिक संविधानिक मूल्यांशी प्रतारणा करणारी आहे. तिचा तीव्र निषेध करतो, असे देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच, ‘माझ्या अध्यक्षतेखालील भाषा सल्लागार समितीने पुढील पंचवीस वर्षांसाठीचे मराठी भाषा विषयक धोरण परिश्रमपूर्वक तयार करून सरकारला सादर केले आहे. त्या संदर्भात सरकारला माझे सहकार्य असेल’, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. देशमुख यांच्या राजीनाम्याला डॉ. घोटाळे यांनीही समर्थन देत समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

विनोद शिरसाठ यांचाही राजीनामा….
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद शिरसाठ यांनीही सदस्यपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे पुस्तक मी अद्याप वाचले नसले तरी नक्षलवादाशी संबंधित कोणतेही पुस्तक, त्याचा लेखक, त्याची विचारसरणी याबाबत माझ्या मनात किंचितही सहानुभूती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एवढेच नाही तर, नक्षलवादाला सहानुभूती हा भाबडेपणाच ठरेल. मात्र, ज्या पद्धतीने शासनाने तो पुरस्कार जाहीर झाल्यावर रद्द केला तो प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व लोकशाही मूल्यांच्या दृष्टीने आक्षेपार्ह आहे. याचा निषेध म्हणून हा राजीनामा

Back to top button