नगर: विहिरीमध्ये पडलेला बिबट्या जेरबंद | पुढारी

नगर: विहिरीमध्ये पडलेला बिबट्या जेरबंद

निघोज, पुढारी वृत्तसेवा: भक्ष्याच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या शनिवारी रात्री विहिरीत पडला. विहीरीत पडलेल्या या मादी बिबट्याला बाहेर काढून पिंजराबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले. पारनेर तालुक्यातील पठारवाडी शिवारात ही यशस्वी मोहीम वनविभागाने राबविली.

पठारवाडी येथील जितेंद्र बबन सुपेकर यांच्या 317 मधील गट नंबरमध्ये विहीर आहे. भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीचा अंदाज न आल्याने बिबट्या शनिवारी रात्री दहाच्या सुमारास विहिरीत पडला. पाइपलाइनच्या लोखंडी पोलचा आश्रय घेत बिबट्याने रात्र काढली. कधी विहिरीच्या कपारीने तर कधी पाईपच्या साहाय्याने बिबट्याने वरती येण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. जितेंद्र हे सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. गावातील मित्रांना बोलावत त्यांनी ही माहिती वनविभागाचे वनपाल एन.एस.जाधव यांना कळविली. वनविभागाचे जाधव व त्यांचे सहकारी वनरक्षक यु. पी खराडे यांनी तत्काळ पठारवाडीत धाव घेतली. बिबट्याला पिंजराबंद करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करीत विहिरीपासून पाच फूट अंतरावर पिंजरा लावला. विहिरीत दोरखंड सोडून बिबट्याला वरती काढण्याचे प्रयत्न सुरू केले. दोरखंडाच्या तोंडालाच पिंजरा असल्याने बाहेर आलेला बिबट्या अलगत पिंजर्‍यात जेरबंद झाला.

बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती सोशल मिडियावर फिरली. त्यानंतर बिबट्या पाहण्यासाठी सुपेकर यांच्या शेतात मोठी गर्दी जमली. पठारवाडी येथील युवा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी संयम राखत कुणालाही विहिरीजवळ जाऊ दिले नाही. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. जेरबंद बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे वय 5 वर्षे असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला. त्याचे वजन साधारण 80 ते 90 किलो असण्याची शक्यता वनविभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तविली.

नैसर्गिक अधिवासात सोडणार

वडझिरे येथील वनपाल एन. एस जाधव, वनरक्षक यु. पी खराडे, अळकुटी येथील वनरक्षक एच. डी आठरे, वनसेवक विठ्ठल वाढवणे, वनसेवक परवेझ शेख, वनमजूर जगताप, वनमजूर पाडळे तसेच विहीर मालक जितेंद्र सुपेकर यांच्या सहकार्यामुळे बिबट्या पिंजराबंद करण्यात यश मिळाले. निघोज येथील पशुवैद्यकीय अधिकार्‍याकडून बिबट्यावर प्राथमिक उपचार करीत त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी रवाना झाले.

Back to top button