सांगली : ऊसतोडी बंद आंदोलन, वाहतूक करणाऱ्या १६ बैलगाड्यांचे टायर ‘स्वाभिमानी’ने फोडले | पुढारी

सांगली : ऊसतोडी बंद आंदोलन, वाहतूक करणाऱ्या १६ बैलगाड्यांचे टायर 'स्वाभिमानी'ने फोडले

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आजपासून ( दि. १७ ) दोन दिवस ऊसतोडी बंद आंदोलन सुरू आहे. आंदोलन पुकारुनही ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या सोळा बैलगाड्यांचे टायर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. हुतात्मा व राजारामबापू साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या या बैलगाड्यांचे वाळवा परिसरात टायर फोडण्यात आले. तसेच ट्रँक्टरची वाहतूक रोखून धरण्यात आली.

एकरकमी एफआरपी मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस ऊसतोडी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. याबाबत कारखानदारांना निवेदन देण्यात आले आहे. तरीही ऊसतोडी सुरुच ठेवल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वाळवा-इस्लामपूर व वाळवा-नवेखेड रस्त्यावर हुतात्मा व राजारामबापू साखर कारखान्याकडे ऊस घेवून जाणाऱ्या बैलगाड्यांचे संतप्त कार्यकर्त्यांनी टायर फोडले. बावची फाट्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रँक्टर आडवून पोलिसांच्यासमोरच ते परत पाठवण्यात आले.

कारखानदारांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली नाही तर आणखी उग्र आंदोलन करु,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांनी ऊसतोडी बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 हेही वाचा :

 

 

Back to top button