नाशिक : सिडको प्रशासकांविरोधात धरणे; बुद्धविहाराला भूखंड नाकारल्याने आंदोलनाचा पवित्रा | पुढारी

नाशिक : सिडको प्रशासकांविरोधात धरणे; बुद्धविहाराला भूखंड नाकारल्याने आंदोलनाचा पवित्रा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
उत्तमनगर येथील त्रिशरण यंग फ्रेण्ड कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेला बुद्धविहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पूर्वी मंजूर केलेला भूखंड सिडको प्रशासनाने नाकारल्याने सिडको प्रशासनाचा निषेध करण्यासाठी बुधवारी (दि.16) सिडको कार्यालयाच्या प्रांगणात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय साबळे, अध्यक्ष विनोद भडांगे, दीपक पवार, बाबासाहेब शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी डॉ. मनीषा जगताप, डॉ. व्यंकट कांबळे, प्रा. गंगाधर अहिरे, डॉ. अनिल आठवले, संपत शिंदे, मोहन अढांगळे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. बुद्धविहार व सांस्कृतिक भवन हे धार्मिक आणि आणि समाजोपयोगी उपक्रमासाठी वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी सिडको प्रशासनाच्या जागेवर असलेल्या भूखंडाची रीतसर मागणी संस्थेने सन 2016 पासून केली आहे. परंतु, सिडको प्रशासनाने अनेक जाचक अटी अधोरेखित करून हे भूखंड संस्थेला विकत घेता येणार नाही, असा छुपा अजेंडा राबविला आहे. सिडको प्रशासकाने 10 ऑगस्ट रोजी संस्थेचा भूखंड नियमित करण्याऐवजी लेखी पत्र देऊन नामंजूर केला आहे. त्यामुळे बौद्ध बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली असून, यास सिडकोचे मुख्य अधिकारी जबाबदार असल्याचे यावेळी पदाधिकार्‍यांनी सांगितले. मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी पदाधिकार्‍यांनी दिला. यावेळी भन्ते सुगत महाधेरो, भन्ते बोधीपाल, धम्मरक्षित, आर्यननाग थेरो, संघरत्न, सारिपुत्र व नाशिक भिक्खू संघ यांच्यासह माजी नगरसेविका किरण दराडे, प्रशांत जाधव, संजय भामरे, संतोष सोनपसारे, भिवानंद काळे, संजय गांगुर्डे, संदीप वानखेडे, गौतम पराडे, अजय साळवे, करुणा पगारे, संदीप वानखेडे, कुणाल वाघ, देवचंद केदारे, बाबासाहेब शिंदे, सुनील जगताप, विशाल डोखे, योगेश निकम, तुळशीराम भागवत, प्रशांत खरात, प्रशांत जाधव, जितू बनकर, मिलिंद पगारे आदींसह समाजबांधव उपस्थित होते. अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदन बगाडे व पोलिस अधिकारी-कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

प्रमुख मागण्या अशा…
सिडको प्रशासनाने त्रिशरण संस्थेला विनाअट भूखंड मंजूर करावा.
सन 2000 मध्ये संस्थेला मंजूर केल्याप्रमाणे भूखंड मंजुरी कायम ठेवावी.
सिडको प्रशासन अधिकार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई व्हावी.
आंबेडकरी बांधवांच्या भावनांची सिडकोने दखल घ्यावी.
सिडकोने इतर संस्थांप्रमाणे नाममात्र अटी-शर्तींवर आमच्या संस्थेलाही भूखंड मंजूर करून सामाजिक न्याय प्रस्थापित करावा.

औरंगाबादला उद्या बैठक..
धरणे आंदोलन करणार्‍यांनी सायं. 4 वाजेच्या सुमारास अचानक सिडको प्रशासकीय कार्यालय परिसरात प्रवेश केला. यानंतर त्यांनी सिडकोच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्रिशरण बुद्धविहार असा फलक लावला. निवेदन स्वीकारण्यास प्रशासक नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनीच यावे, अशी भूमिका घेतल्यानंतर तहसीलदार अनिल दौंडे सिडको कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी निवेदन स्वीकारले. यानंतर औरंगाबाद येथील मुख्य प्रशासक दीपा मुधोळ मुंडे यांच्याशी संपर्क साधला. यानंतर शुक्रवार दि.18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता औरंगाबाद येथे मुख्य प्रशासक यांच्या कार्यालयात बैठक आयोजित केली आहे.

हेही वाचा:

Back to top button