सांगली : तासगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; पुन्हा आबा-काका गट भिडणार | पुढारी

सांगली : तासगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; पुन्हा आबा-काका गट भिडणार

तासगाव; दिलीप जाधव : तासगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. ९६ प्रभागातील २६२ सदस्य आणि थेट सरपंच पदाच्या २६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने परंपरागत प्रतिस्पर्धी असलेले आबा-काका गट पुन्हा एकदा एकमेकांशी भिडणार आहेत. त्यामुळे काँग्रेससह शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट नेमकी काय भूमिका घेणार, याकडेही संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय पाटील यांच्यासह त्यांचा गटही ॲक्टिव्ह मोडवर आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक आणि किंदरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मिळालेले यश टिकविण्याचे आव्हान राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील यांच्यापुढे असणार आहे.

२०१७ साली झालेल्या निवडणुकीत या २६ पैकी १६ ग्रामपंचायतीत खासदार संजय पाटील गटाची, ९ ग्रामपंचायतींवर आमदार सुमन पाटील गटाची तर बेंद्री ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली होती. थेट सरपंच निवडणुकीत खासदार पाटील गटाकडून निवडून आलेल्या सावर्डेच्या प्रदीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सावर्डे ग्रामपंचायतीवर भगवा फडकला. आमदार सुमन पाटील गटाच्या खुजगावच्या सरपंच अश्विनी पाटील यांनी राष्ट्रवादीशी अबोला धरुन भाजपशी संधान साधले. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून बेंद्रीच्या विकास पाटील यांनी काँग्रेसचा हात धरला.

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी १६ ग्रामपंचायतींवर खासदार पाटील गटाची सत्ता आहे. तर आठ ग्रामपंचायतींमध्ये आमदार सुमन पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. प्रत्येकी एका ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसची सत्ता आहे. दरम्यान, २५ वर्षांचा होईपर्यंत एकही विरोधक शिल्लक न ठेवण्याची प्रतिज्ञा केलेल्या रोहित पाटील यांना सध्या सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींची सत्ता टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागणार आहे.

 तासगाव तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती आणि सदस्य संख्या

अंजनी (११), आरवडे (११), बलगवडे (९), बस्तवडे (११), बेंद्री (७), भैरववाडी (७), चिंचणी (१७), कचरेवाडी (७), खुजगाव (९), कुमठे (१५), लिंब (७), मणेराजुरी (१७), मतकुणकी (९), नागांव निमणी (९), नागेवाडी (७), नेहरुनगर (९), निमणी (९), पानमळेवाडी (७), पुणदी (९), सावर्डे (१३), शिरगांव कवठे (९), उपळावी (११), वंजारवाडी (९), वायफळे (१३), वासुंबे (१३), योगेवाडी (७)

हेही वाचा :

Back to top button