सांगली : आमदार संतोष बांगरांनी कृषी विभागाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सांगली
सांगली

जत; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांनी कृषी अधीक्षकांना अपमानित व शिवीगाळची भाषा वापरली. ही बाब महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही. या घटनेमुळे राज्यातील सर्व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या भावना दुखावल्या आहेत. काम करताना त्यांच्यात असुरक्षितेची भावना निर्माण होऊन, त्याचा त्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होत आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी, कर्मचारी व कृषी संघटनांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, आ. संतोष बांगर यांनी हिंगोली येथील कृषी अधिक्षक यांना अपशब्द वापरले. संतोष बांगर यांनी पिक विमा कार्यालयात बोलावून अधिकाऱ्यांच्या वयाच्या ज्येष्ठतेचा आणि पदाचा विचार न करता कानाखाली आवाज काढीन, असे शब्द वापरले. शेतकऱ्यांसमोर समस्त कृषी विभागाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करुन, नाहक मानसिक त्रास दिला आहे. या असंवैधानिक वागणुकीमुळे जिल्ह्यातील कृषी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये दहशत व भितीचं वातावरण तयार झाले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

तसेच पूर्वी वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीच्यावेळी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी कायमच भक्कमपणे उभा राहिला आहे. या पुढेही राहिल. मात्र, नाहकपणे कृषी विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले जात आहे. त्यांना अपमानित करुन, त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. त्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी जतचे तालुका कृषी अधिकारी हणमंतराव मेडीदार ,तासगावचे तालुका कृषी अधिकारी एस. के. अमृतसागर कृषी विकास अधिकारी विनायक पवार जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश नागरगोजे, तंत्र अधिकारी ए. एस. कवठेकर ए. एस .कवठेकर, एस.बी फडतरे, पी. सी.वाघ, मधुरा काळे, पी.बी. बनसोडे, एस .आर. निकम पवार आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news