मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशी आणि परदेशीं पर्यटकांचे आकर्षण असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन उद्या 22 ऑक्टोबर पासून पुन्हा
रुळावर धावणार आहे . तब्बल तीन वर्षानंतर नेरळ ते माथेरान दरम्यान थेट मिनी ट्रेन धावणार आहे. सध्या अमन लॉजते माथेरान दरम्यान शटल सेवा सुरु आहेत. 2019मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरान दरम्यानच्या डोंगर भागातून जाणार्या मिनी ट्रेनच्या
रुळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसामुळे रुळाखालील खडीसह रुळही वाहून गेले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंद केली होती. प्रवासी,पर्यटक आणि स्थानिकांच्या सोयीसाठी अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा चालविण्यात येतात.
नेरळ ते माथेरान मार्गावर आता नवीन रूळ, खडी तसेच अन्य कामे केली आहेत. नेरळ ते अमन लॉज दरम्यान 20 किलोमीटरच्या नविन रुळांचे काम केले आहे. अपघात होऊ नये यासाठी रुळांच्या बाजूला उपाययोजनाही केल्या आहेत. रेल्वे मार्गाचे काम पुर्ण होताच चाचणी देखील सुरु करण्यात आली.