सांगली : जतमध्ये दसरा सीमोल्लंघन उत्साहात; पारंपरिक कलाकृतीचा अविष्कार | पुढारी

सांगली : जतमध्ये दसरा सीमोल्लंघन उत्साहात; पारंपरिक कलाकृतीचा अविष्कार

जत (सांगली) : पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील डफळापूर, शेगाव, येळवी, आवंढी, उमदी, माडग्याळ, उमराणी, संख, बनाळी येथे पारंपरिक पद्धतीने विजयादशमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

जत येथे विजयादशमीनिमित्त यल्लमादेवीच्या मंदिरात पहाटे श्रीची विधिवत अभिषक पूजा व आरती करण्यात आली. तसेच डोंगर निवासिनी श्री अंबिका देवीच्या डोंगरावर विजयादशमी दिवशी सकाळी आरती व जोगव्याचा जागर करण्यात आला. बनाळी येथे बनशंकरीची पूजा उत्साहात करण्यात आली.

जत ही नगरी अवलिया पीर चिनगीबाबाची नगरी आहे, असे मानले जाते. चिनगीबाबाच्या दर्ग्याजवळ असलेल्या बुरूजावर तसेच शहरातील वेशीजवळ असलेल्या बुरूजावर डफळे राजघराणेचे श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी पांढरे निशाण असलेली ध्वज पताका उभी केली. यावेळी सर्व मानकरी उपस्थित होते.

सायंकाळी दसरा सीमोल्लंघननिमित्त शहरातील जुन्या राजवाड्यापासून श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत अनिल शिंदे, गणपतराव कोडग, मोहन माने-पाटील, शिवसेना नेते दिनकर पतंगे, राजेंद्र आरळी, डॉ. विजय पाटील, सुरेश डफळे, महादेव माळी, कैलास गायकवाड, संग्राम राजेशिर्के आदी सहभागी झाले होते. ही पालखी मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या निनादात येथील वेशीत आल्यानंतर या ठिकाणी लावण्यात आलेल्या शमीच्या रचलेल्या ढिगाला पालखीच्या पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या.

श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी विधिवत शमीची पूजा केल्यानंतर पुरोहित रमेश पुरोहित यांनी विधिवत पध्दतीने शस्त्राची व पोथीची पूजा झाली. गणेशाची व दुर्गा मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर दसरा सीमोल्लंघन झाले.

यावेळी पी. डी. कटरे, डॉ. देवानंद वाघ, मधुकर जाधव, बाळासाहेब जाधव, अमर जाधव, श्रीकृष्ण पाटील, मल्लिकार्जुन काळगी, मोहन चव्हाण, धर्मराज माने, भारत गायकवाड, मदन माने-पाटील, कैलास आदाटे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button