विटा : विरोधकांची कोणतीच गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज नाही : सुभाष भिंगारदेवे | पुढारी

विटा : विरोधकांची कोणतीच गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज नाही : सुभाष भिंगारदेवे

विटा : पुढारी वृत्तसेवा : आमच्यामुळेच १० टक्के चतुर्थ वार्षिक कर आकारणी रद्द झाली. त्यामुळे काही धंदेवाईक, निवडणुका आल्यावर जागे होणाऱ्या आणि विटेकरांनी वारंवार मोठ्या मताने नाकारलेल्या लोकांची कोणतीच गोष्ट गांभिर्याने घ्यायची गरज नाही, अशा शब्दांत माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे यांनी विरोधकांना पत्रकातून फटकारले आहे.

विटा नगरपालिकेची १० टक्के चतुर्थ वार्षिक कर आकारणी रद्द झाली. यावरून आजी आमदार बाबर आणि माजी आमदार पाटील यांच्या गटांत चांगलाच श्रेयवाद रंगला आहे. कोरोना महामारी पश्चात विस्कटलेल्या आर्थिक गणितांमुळे चतुर्थ वार्षिक करआकारणी मार्चपर्यंत स्थगित करण्याची मागणी विटा पालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आणि अन्य सदस्यांनी गेल्या आठवड्यात पालिका प्रशासक संतोष भोर यांच्याकडे केली होती. यानंतर विटेकरांची १० टक्के करवाढ रद्द झाली. मात्र, ही करवाढ आपल्यामुळेच रद्द झाली, असा दावा विरोधी गटाने गुरुवारी केला होता.

तसेच ज्यांनी २० टक्के करवाढ करण्याचा ठराव मंजूर केला. त्यांनीच केवळ आगामी निवडणुकीत सत्ता जाईल, या भीतीनेच ती मार्च २०२३ पर्यंत करवाढ स्थगित करण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांना आता १० टक्के करवाढ मागे घेतल्याचे श्रेय घेण्याचा अधिकार नाही, अशी टीका त्यांनी केली होती. तसेच वाढीव पाणीपट्टी आणि कोंडवाड्याबाबतही काही सवाल केले होते. यावर आज पाटील गटाचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे यांनी पालिकेच्या मावळत्या कौन्सिल सदस्यांच्यावतीने प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

यात त्यांनी गेल्या दोन वर्षात विटा पालिकेचे ६० टक्क्यांपर्यंत घसरलेले वसुलीचे प्रमाण विचारात घेऊन किमान मार्च २३ पर्यंत करवाढ स्थगित करावी. आणि जुन्या थकवसुलीला प्राधान्य द्यावे, अशी वास्तववादी मागणी आम्ही माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली होती. यावर प्रांताधिकारी तथा प्रशासक संतोष भोर यांनी सकारात्मक व दिलासा देणारी भूमिका घेऊन निर्णय करु, असे ठोस आश्वासन दिले होते. आणि त्यानुसारच त्यांनी तातडीने कार्यवाही करीत ही करवाढ २० ऐवजी १० टक्के केली. वाढीव करास पूर्णपणे स्थगिती देऊन मार्च २०२३ पासून १० टक्के दरवाढ करायला पाहिजे, अशी आमची मागणी आजही कायम आहे.

खुद्द कौन्सिल सदस्यच करवाढ करु नका, अशी मुद्देसुद कारणासह मागणी करत असल्याने प्रशासनानेही गांभीर्याने विचार करुन विटेकरांना दिलासा दिला. मात्र, विरोधकांनी विनाकारण मावळत्या कौन्सिलवर बेछुट आणि हास्यास्पद आरोप केले आहेत. त्यांचा आकांडतांडव आणि स्टंट करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. परंतु सुज्ञ विटेकरांनी गेल्या ५० वर्षात प्रत्येक निवडणुकीत कृतीतून त्यांची जागा दाखवून दिली आहे, असे सुभाष भिंगारदेवे यांच्यासह वैभव पाटील, किरण तारळेकर, सचिन शितोळे, प्रशांत कांबळे, दहावीर शितोळे, संजय तारळेकर, सुखदेव पाटील, अविनाश चोथे, प्रताप सुतार, फिरोज तांबोळी, माजी आमदार पाटील गटाच्या सर्व कौन्सिल सदस्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button