सांगली : शेटफळे येथे नवरात्रौत्सवानिमित्त कामाख्यादेवी मंदिरातून ज्योत | पुढारी

सांगली : शेटफळे येथे नवरात्रौत्सवानिमित्त कामाख्यादेवी मंदिरातून ज्योत

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा:  शेटफळे (ता.आटपाडी) येथील जोगेश्वरी नवरात्र उत्सव मंडळामार्फत यंदा नवरात्र उत्सवाची ज्योत गुवाहटी येथील जगप्रसिद्ध कामाख्यादेवी मंदिरातून आणण्यात आली. सुमारे ६ हजार ६०० किलोमीटर अंतरावरून धावत ज्योत आणलेल्या नवरात्र उत्सव मंडळाच्या तरुणांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजा करत घटस्थापना करण्यात आली.

शेटफळे (ता. आटपाडी) येथील जोगेश्वरी नवरात्र उत्सव मंडळाचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे. देशाच्या विविध भागातून मंडळाकडून ज्योत आणली जाते. कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर, नाशिक येथील त्र्यंबकेश्वर, मुंबई येथून मुंबादेवी, जम्मू येथील वैष्णोदेवी, औंध येथील यमाई देवी, सातारा येथील मांढरदेवी, म्हैसूर येथील चामुंडादेवी, बनाळी येथील बनशंकरी या भागातून मंडळाने ज्योत आणली आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे उत्सव साजरा करता आला नाही. यंदा मंडळाने गुवाहटी येथील कामाख्यादेवी मंदिरातून धावत ज्योत आणण्याचा संकल्प केला होता. मंडळाचे ४५ तरुणाचे पथक ३१ ऑगस्टला रवाना झाले होते. हे पथक आज शेटफळे येथे पोहोचले.

आसाममधील गुवाहटी येथील महाराष्ट्राचे सुपुत्र जिल्हाधिकारी नितीन खाडे, भारतीय आर्मी ऑफिसर शंतनु गुठणारे, आयपीएस अधिकारी धनंजय धनवंत आणि डॉ. विजय कुलकर्णी या मंडळींनी जल्लोषी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांची मुक्कामाची आणि जेवणाची सोय केली. ५ सप्टेंबर रोजी भल्या पहाटे मंदिरातून ज्योत घेऊन मंडळाचे पथक महाराष्ट्राकडे निघाले. जागोजागी महाराष्ट्रीयन आणि स्थानिक लोकांकडून या पथकाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याआधी मंडळाने जम्मू येथील वैष्णवी देवी मंदिरातून ६००० किलोमीटर अंतरावरून ज्योत आणली होती.यंदा त्याही पुढचा टप्पा मंडळाने गाठला आहे. गुवाहाटी ते शेटफळे ६६०० किलोमीटर अंतर आहे. १७ दिवसात हे अंतर कापून ज्योत गावात पोहोचली.

उपसरपंच निवृत्ती गायकवाड, महेंद्र भोरे, अनिल गायकवाड, महेश गायकवाड, रणजीत गायकवाड, संतोष गायकवाड, दीपक गायकवाड, सत्यजित मोकाशी, संदेश गायकवाड, शुभम गायकवाड, विश्वजीत गायकवाड, राज शिंदे, सुनील मंडले आदी मंडळाचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

         हेही वाचलंत का ?

 

Back to top button