नवरात्रौत्सवात होते श्रीकृष्णाची पूजा | पुढारी

नवरात्रौत्सवात होते श्रीकृष्णाची पूजा

नारायण राटवड
ज्येष्ठ पत्रकार, म्हापसा

भाद्रपदातील गणेशोत्सवाचा आनंद संपतो न संपतो तोच आश्विन महिन्यातील नवरात्रौत्सवाची धूम सुरू होते. संपूर्ण देशात आणि गोव्यातही प्रत्येक देवीच्या मंदिरात नवरात्रौत्सव विविध कार्यक्रमांनी आणि विविध प्रकारांनी साजरा केला जातो. म्हापसा शहरात सातेरी देवीच्या मंदिरातील कार्यक्रमांसह श्रीकृष्ण पूजन काही घरांत, तर काही ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात केले जाते.

म्हापशात श्रीकृष्ण मूर्तीपूजन वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक नऊ ते 10 दिवस कार्यक्रमांची खैरात असते. विशेषकरून खोर्ली भागात टाळ-मृदंगांच्या तालावर भक्त भजनात गुंतलेले दिसतात. येथील सारस्वत विद्यालय, ज्ञानप्रसारक विद्यालयात 100 वर्षांपूर्वीपासून माता सरस्वतीचे पूजन करतात. त्याप्रीत्यर्थ शाळांत विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. ज्ञानप्रसारक विद्यालयात तीन दिवसांची व्याख्यानमाला चालू असते. मुलांचा अभ्यास सांभाळून सर्व कार्यक्रम सादर करण्याची किमया शिक्षकांना करावी लागते.
म्हापसा शहरात सार्वजनिक कृष्णपूजन पोर्तुगीज काळातही होत असे. कृष्ण पूजनाला एक ऐतिहासिक महत्त्वही आहे.

संबंधित बातम्या

खोर्ली येथील कासारवाड्यावर त्यावेळी घरोघरी कृष्ण पूजन होत असे. महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर म्हणजे नवरात्रौत्सवात येत असल्याने तत्कालीन युवक या दिवशी श्रीकृष्णाच्या भजनाच्या निमित्ताने महात्मा गांधी आणि भारतमातेचे पूजन राष्ट्रभक्तीपर गीते म्हणून स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन देत होते. याचा परिणाम असा झाला की, या वाड्यावरील युवक देशप्रेमाने पेटून उठून स्वातंत्र्य चळवळीत उतरले. खोर्लीतील कासारवाड्यावरील कृपावंत लांजेकर, सिद्धेश्वर लांजेकर, रामेश्वर लांजेकर हे एकाच घरातील बंधू. प्रभाकर तिवरेकर, नरसिंह येंडे, नारायण साप्ते, श्रीपाद साप्ते, दीनानाथ येंडे, प्रभाकर येंडे, महाबळेश्वर सावंत, रामकृष्ण सावंत, लीलावती सावंत इत्यादींनी प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. सत्याग्रह केले आणि तुरुंगवासही भोगला. त्याशिवाय त्यांचे कित्येक मित्र आणि सहकारी देशप्रेमाने प्रोत्साहित होऊन अप्रत्यक्षपणे स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्य तनामनात जागवले तद्वत खोर्ली तसेच उर्वरित म्हापसा भागात स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग त्यावेळी पसरविण्याचे काम श्रीकृष्ण पूजनाने झाले. म्हणूनच या श्रीकृष्ण पूजनास ऐतिहासिक म्हणता येईल. वरील स्वातंत्र्य सैनिकांमधील एक विनायक साप्ते हा याच चळवळीत उतरल्याने हुतात्मा झाला. त्याचे नाव येथील हनुमान मंदिर ते खोर्ली सीमा या रस्त्याला देऊन त्यास चिरंतन स्मृतीत ठेवण्यात आले आहे.

त्यावेळी संगीत शिक्षकांची वानवा होती. तरीही तत्कालीन युवक संगीत शिक्षकांना बोलावून घेऊन भजन शिकत. तबला, संवादिनी शिकत आणि श्रीकृष्ण पूजनावेळी अभंग सादर करीत. तीच परंपरा पुढे चालू राहिली. त्यामुळे आजही खोर्ली भागात प्रवेश केला तर किंवा म्हापशात ज्या ज्या ठिकाणी श्रीकृष्ण पूजन सार्वजनिक ठिकाणी करण्यात आले आहे, त्या ठिकाणी संध्याकाळी सात वाजल्यानंतर भजनाची सुरेख धून ऐकायला मिळते.

म्हापशात सार्वजनिक कृष्ण पूजन शेटयेवाडा धुळेर, दत्तवाडी दत्तमंदिर, तळीवाडा ब्रह्मवाठारेश्वर, आंगड येथे दोन ठिकाणी, तार नदीच्या काठावर साखळेश्वर मंदिरात, घाटयेश्वर देवस्थान खोर्ली, राष्ट्रोळी देवस्थान, लक्ष्मीनारायण मंदिरासमोर, अन्साभाट येथे श्रीकृष्ण मंडळ, आमोलवाडा खोली, सातेरी देवस्थान मंदिराच्या मागे, श्रीकृष्ण मंदिर घाटेश्वर नगर, उमेश राटवड यांच्या निवासस्थानी, गजानन शिंदे निवासस्थान, नगराध्यक्ष सुभांगी वायंगणकर यांच्याशेजारी, खोर्ली-सरकारी शाळेजवळ व खोर्ली शांतीनगर येथे सार्वजनिक कृष्ण पूजन थाटात केले जाते. काही ठिकाणी स्पर्धात्मक कार्यक्रम, काही ठिकाणी घुमट आरत्या, काही ठिकाणी कथा, कीर्तने तर काही ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होतो. घाटेश्वर देवस्थानच्या श्रीकृष्ण पूजनोत्सवात नाटकही सादर केले जाते. हुतात्मा विनायक साप्ते यांचे वडील धर्मा साप्ते यांना लहानपणापासून चिकणमातीच्या मूर्ती बनवायची आवड होती. त्यांनी सर्वप्रथम श्रीकृष्णाची एक मूर्ती बनवली. तिचे पूजन केले. तत्कालीन त्यांच्या सवंगड्यांनी त्यात भाग घेतला. पुढील वर्षी दोघा-तिघांनी तशीच मूर्ती बनवायला सांगितली आणि आपल्या घरात श्रीकृष्णाची मूर्ती बसवली. मग आरती व भजन सुरू झाले. तोपर्यंत भालचंद्र नाटेकर व सोनू नाटेकरांनी सरस्वतीच्या मूर्ती बनवताना श्रीकृष्णाच्या रंगीत मूर्ती बनवायला सुरुवात केली. त्यास व्यावसायिक रूप आले.

चतुर्थी उत्सवातील गणपती पूजन करताना घरातील सर्वजण सोवळे ओवळे पाळतात. शाकाहारी जेवण बनवतात. या कृष्ण पूजनास कसलेच बंधन नसल्याने घरच्यांचा विरोध नव्हता. खरं म्हणजे हा काळ समुद्रातून खूप मासे पकडायचा. मासे खाण्यास आणि घरात आणण्यास विरोध नसल्याने दिलखुलास श्रीकृष्ण पूजन व्हायचे. अधिक खर्चिकही नव्हते. भजनाच्या वेळी प्रसाद म्हणून एखादे फळ कापून द्यायचे. तर कुणाकडे पंचखाद्य, शिरा, इत्यादी प्रसाद म्हणून मिळायचे. पुढे श्रीकृष्ण पूजनाचा प्रसार संपूर्ण म्हापशात झाला. ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेे. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक श्रीकृष्ण पूजनास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. यात तरुण मंडळी गुंतली गेली.

काही वर्षांपूर्वी म्हणजेच टी.व्ही.च्या जमान्यात पूर्वी रस्त्यावर सफेद स्क्रीन टाकून रामायण, महाभारतासारखे सिनेमेही प्रदर्शित केले जायचे. आता श्रीकृष्ण पूजनात स्पर्धात्मकता आली. आमचे कार्यक्रम चांगले होतात की तुमचे? याची तुलना होऊ लागली. नऊ दिवसांची घटस्थापना संपली की, दसर्‍याच्या दिवशी सरस्वती व श्रीकृष्णाच्या मूर्तींची विधिवत विसर्जन केले जाते. काहीजण कोजागिरीपर्यंत मूर्तीचे विसर्जन करतात. दसर्‍याच्या दिवशी येथील हनुमान मंदिराची पालखी खोर्लीची सीमा ओलांडून सीमोल्लंघन करते व खोर्ली येथील स्व. दत्ता सावंत यांच्या घरी थांबते. तिथे पूजा-अर्चा, आरती इत्यादी सोपस्कार झाल्यावर आपट्याच्या झाडाची पाने व फांद्या तोडून सोनं लुटण्याचा आनंद घेतात. हनुमंताच्या पालखीचे स्वागत खोर्ली तसेच म्हापशातील वहीवाटीच्या जागांवर केले जाते. पालखीसोबत बसवेण्णाप्पांचे बँडही असते. एक आगळावेगळा कार्यक्रम नवरात्रीच्या शेवटाला म्हापशात होतो. या आनंददायी वातावरणात भक्त हरपून जातात. तसेच खोर्लीतील श्री सातेरी मंदिरात नऊही रात्रीस भजन वा कीर्तनाचा कार्यक्रम सातत्याने चालू असतो. सर्वत्र मंगलमय व आनंदी वातावरण असते.

Back to top button