नवरात्रोत्सव : किल्ले प्रतापगडावर भवानी मातेच्या नवरात्र उत्सवास सुरुवात | पुढारी

नवरात्रोत्सव : किल्ले प्रतापगडावर भवानी मातेच्या नवरात्र उत्सवास सुरुवात

प्रतापगड; पुढारी वृत्तसेवा: किल्ले प्रतापगडावर पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सवास सुरुवात झाली. सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. यावेळी विधिवत पूजन करण्यात आले.

प्रतापगडावरील घटस्थापनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, मंदिरात दोन घट बसवले जातात. एक छत्रपती महाराजांच्या नावाने. कारण त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणून तर दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांच्या नावाने. कारण राजाराम महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबुत केला आहे. राजाराम महाराजांचे गडावर कित्येक वर्षे वास्तव्य होते. अनेक वर्षापासूनची ही परंपरा आजही सुरू आहे. श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे व श्री. छत्रपती उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी संपुर्ण मंदिराला रंगरंगोटी करून मनमोहक झुंबर बसवल्यामुळे मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.

ध्वज बुरुजवर महाबळेश्वर पोलिस ठाण्याच्या वतीने दरवर्षी ११ मिटरचा भगवा ध्वज फडवण्याची परंपरा आहे. यानुसार सोमवारी (दि. २६) रोजी सकाळी महाबळेश्वर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप भागवत, सहायक पोलिस निरीक्षक पावरा व सर्व ग्रामस्थाच्या उपस्थितीत ध्वज फडवण्याचा कार्यक्रम पार पडला. यावर्षी कुठलेही निर्बंध नसल्याने लाखो भक्त भवानी मातेच्या दर्शनासाठी येणार असल्याने मंदिर व्यवस्थापन व पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी पारंपारिक असणारे सेवेकरी किल्लेदार हवालदार, फडणीस, पुराणीक, उतेकर, मोरे, कासुर्डे, जंगम, जाधव (रा. जापुरे) आज देखील वंशपरंपरेने आई भवानीची नित्यनेमाने सेवा करतात.

हेही वाचलंत का? 

Back to top button