महाड; पुढारी वृत्तसेवा: महाड तालुक्याच्या वरंध गाव परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांत गुरे- बकरी चराई करणाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, वनखात्यासह स्थानिक प्रशासन बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
वरंध ग्रामस्थांमधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अनिल पिलाने, रितेश सकपाळ, शौकत पवेकर, जलील पेवेकर व महम्मद भाई हे शेतकरी रानामधे (कौली, खोंड्यामध्ये) गुरे व बकरी चराई करण्यासाठी गेले होते. अचानक दोन बिबट्यांने शौकत पेवेकर यांच्यासह अनिल पिलाने यांच्या बकरीवर हल्ला केला.
अनिलने व शौकतने मोठ्या धाडसाने बिबट्यांवर काठ्या व कोयत्याने प्रतिहल्ला करून आपले स्वतःचे सहकाऱ्यांचे आणि बकऱ्यांचे प्राण वाचविले.
या प्रसंगामुळे आरडाओरडा झाल्याने सभोवताली असलेले गुरे चराई करणारे सहकारी रितेश सकपाळ, नागेश देशमुख, महम्मंद भाई व जलील पेवेकर व मोहल्ला ग्रामस्थ त्याच्या मदतीला धावून आले. या हल्ल्यामध्ये बकरी व शौकत पेवेकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
या घटनेदरम्यान बाजूला असलेल्या फळाबागांमध्ये काम करणारे प्रवीण देशमुख, योगेश देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख व अनिल देशमुख या शेतकर्यांसह मजुर मदतीसाठी धावून आले.
प्रशासनाने याप्रसंगाची गंभीर दखल घेऊन शेतकरी व पशुपालन वर्गाला सरंक्षण व मदत करावी, अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचलं का?