सांगलीसाठी हवे वैद्यकीय महाविद्यालय

सांगलीसाठी हवे वैद्यकीय महाविद्यालय

सांगली : शशिकांत शिंदे   सार्वजनिक – खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेष उपचार रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे सांगली सिव्हिल परिसरात नवीन स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी विविध संस्था पुढे सरसावल्या आहेत. हे महाविद्यालय झाल्यामुळे त्याचा सर्वसामान्य रुग्णांना लाभ होणार आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार आपल्या देशात लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्याशिवाय आपल्या देशात शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात खूपच कमी तरतूद केली जाते. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. ही बाब कोरोना संसर्गाच्या काळात स्पष्ट झाली आहे.

कोरोनाच्या दोन्ही लाटांत अनेक रुग्णांना बेडही मिळाले नाहीत. उपचारासाठी डॉक्टर आणि त्यांना मदत करणारे कर्मचारी, तसेच परिचारिका पुरेशा प्रमाणात नाहीत. सुविधा आणि उपचार यांच्या अभावामुळे अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिक आणि खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सध्या तीन वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यापैकी मिरज येथे शासकीय महाविद्यालय आहे. त्याशिवाय भारती मेडिकल कॉलेज आणि इस्लामपूर येथील महाविद्यालय खाजगी आहेत. सांगलीसाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र विविध कारणांनी ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.

सध्या सांगलीचे सिव्हिल रुग्णालय मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न आहे. अलिकडे मिरज येथील रुग्णालय सुद्धा सुसज्ज करण्यात आले आहे. त्या ठिकाणी बेडची संख्याही वाढवण्यात आली असून सध्या 310 बेड आहेत. सांगलीत 390 बेडचे सुसज्ज असे सिव्हिल रुग्णालय आहे. त्याशिवाय आणखी 500 बेडचे नवीन हॉस्पिटल होणार आहे. सिव्हिल रुग्णालयाच्या परिसरात मोकळी जागा मोठ्या प्रमाणात आहे.

सांगली सिव्हिल रुग्णालयात सांगली जिल्ह्यासह राज्यातून आणि कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. सर्वसामान्य गरजू आणि अनेक मध्यमवर्गीय लोक सुद्धा रुग्णालयातील उपचारांचा लाभ घेत असतात. राज्य सरकार येत्या दहा वर्षांत वैद्यकीय पदवीच्या दरवर्षी दोन हजार सहाशे जागा वाढवणार आहे.त्यापैकी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1800 एमबीबीएसची तर सध्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आठशे जागांची वाढ करणार आहे. या धोरणाची अंमलबजावणी पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्यावतीने करण्यात येणार आहे. सांगली सिव्हिल रुग्णालयात रुग्णांची संख्या, जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेता येथे सांगलीसाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणे आवश्यक आहे.

सार्वजनिक – खासगी माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यासाठी चालना मिळणार आहे. सांगलीत महाविद्यालय सुरू झाल्यास त्याचा सर्वसामान्य रुग्णांना लाभ होणार आहे. हे महाविद्यालय होण्यासाठी माझा सुद्धाप्रयत्न असणार आहे.

– संजय पाटील, खासदार

सांगलीत सुसज्ज असे सिव्हिल रुग्णालय आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 200 बेडचे आणि एन. एम. एच. मधून शंभर बेडचे हॉस्पिटल मंजूर झाले आहे. त्याचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. सिव्हिल परिसरात मोकळी जागाही उपलब्ध आहे. त्यामुळे सांगलीसाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी माझ्याकडूनही पाठपुरावा सुरू आहे.

– सुधीर गाडगीळ, आमदार

नाममात्र शुल्कामध्ये उपचार हवेत

राज्यभरात खासगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालये आहेत. मात्र या ठिकाणी दिले जाणारे उपचार हे सामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत. राज्य सरकारकडून प्रस्तावित असलेले महाविद्यालय खासगी गुंतवणुकीतून उभारले जाणार आहे. त्यामुळे या रुग्णालयामध्ये सवलतीच्या दरात नाममात्र शुल्क घेऊन उपचार करणे गरजेचे आहे. याबाबत आतापासूनच सरकारने काही धोरण निश्‍चित करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया आहे.

पाश्‍चिमात्य देशाच्या तुलनेत आपल्याकडे लोकसंख्येच्या प्रमाणात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे. वैद्यकीय सुविधांचाही अभाव आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पुढील काळात आरोग्य सुविधा मिळण्यासाठी व डॉक्टरांची संख्या वाढण्यासाठी सांगलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणे आवश्यक आहे. – डॉ. नितीन पाटील, सांगली आयएमए

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news