जत : जन्मदात्या वृध्द बापाचा मुलाकडून खून; आईलाही मारहाण

जत : जन्मदात्या वृध्द बापाचा मुलाकडून खून; आईलाही मारहाण

जत; पुढारी वृत्तसेवा : कोसारी (ता.जत) येथे पेन्शनचे पैसे दारूसाठी का देत नाही, असे म्हणत जन्मदात्या आई-वडिलांना पोटाच्या मुलाने गंभीर मारहाण केली. यावेळी पोराने लोखंडी स्टॅन्डने गंभीर मारहाण केल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २) रात्री घडली आहे. आप्पासाहेब कृष्णा तोरवे (वय ७०, सेवानिवृत्त सुभेदार) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. दरम्यान या मारहाणीत मुलाची आई ललिता आप्पासाहेब तोरवे या देखील जखमी झाल्या आहेत. खून केलेला संशयित आरोपी प्रमोद आप्पासाहेब तोरवे (वय ३५) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आप्पासाहेब तोरवे भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार आहेत. ते गावातच पत्नी ललिता व मुलगा प्रमोद यांच्यासह वास्तव्य करत होते. त्याचा एक मुलगा कामानिमित्त बाहेरगावी असतो. दरम्यान आप्पासाहेब तोरवे यांनी शुक्रवारी जत येथील स्टेट बँकेतून पेन्शनचे पैसे घरी आणले होते. दुपारी प्रमोदने आई ललिताकडे पैशाची मागणी केली. आईने माझ्याकडे पैसे नसल्याचे स्पष्ट केले व वडिलांकडून तुला काय लागेल ते पैसे घे असे सांगितले.

यावेळी आरोपी प्रमोदने आई ललितास बेदम मारहाण केली. मारहाण केल्याने स्वतःच्या बचावासाठी आई घरातून बाहेर निघून गेल्या. शुक्रवारी रात्री बाप – लेकाचे कडाक्याचे भांडण झाले. प्रमोद दारूच्या नशेत असल्याने तो वडिलांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दररोजच्या या भांडणाकडे शेजारच्या लोकांनी फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. प्रमोदने घरासमोरील माठ ठेवण्याचा स्टँड वडिलांच्या डोक्यात घातला. यात आप्पासाहेब तोरवे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची पुसटशी कल्पना शेजाऱ्यांना नव्हती. मात्र शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी दारातील रक्ताचा सडा पाहिल्यानंतर अधिक चौकशी केली असता खून झाल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शेजारच्या व्यक्तीच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसात दिली. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवलेयांनी भेट दिली.या घटनेची कसून चौकशी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे यांनी घटनेचा पंचनामा केला व घटनास्थळावरुन मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीस ताब्यात घेतले आहे.

याबाबतची फिर्याद सुमन विजय ऐदाळे (वय.६०) यांनी जत पोलिसात दिली आहे. यावरून संशयित आरोपी प्रमोद तोरवे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news