टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात आज पुन्हा रंगणार धूमशान | पुढारी

टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात आज पुन्हा रंगणार धूमशान

यंदाच्या आशिया चषकाच्या फॉरमॅटचा मुख्य हेतू हाच आहे की भारत आणि पाकिस्तान जातीत जास्त वेळा कसे एकमेकांसमोर येतील. पहिल्या साखळी सामन्यानंतर अपेक्षेप्रमाणे आज ते सुपर फोरच्या लढतीत भिडतील आणि समस्त मीडिया आणि जाहिरातदारांचे नशीब बलवत्तर असेल तर पुढच्या रविवारी अंतिम सामन्यातही ते एकमेकांसमोर असतील. आपल्या गटातून भारत पाकिस्तान हे सुपर फोरमध्ये जातील हे नक्‍की होते, पण या सुपर फोरमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांनी ज्या दुबळ्या हाँगकाँगला हरवले त्या हरवण्यातील फरकाने आपल्या संघांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडावा लागेल.

हाँगकाँगविरुद्ध आपल्या कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी तर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि फकर झमन यांनी प्रमुख धावा काढत 190 चा टप्पा आपापल्या संघांसाठी गाठला. फरक आहे तो गोलंदाजीमधला. पाकिस्तानी नेत्यांचा प्रमुख गोलंदाज शाहिन आफ्रिदी किंवा मोहम्मद वासिम यांच्याशिवाय हाँगकाँगला 38 धावात गुंडाळले तर याच हाँगकाँगच्या फलंदाजांनी आपल्या गोलंदाजांविरुद्ध चांगली फलंदाजी केली.

आतापासून ऑक्टोबरपर्यंतच्या सर्व ट्वेन्टी-20 सामन्यांकडे प्रत्येक देश हा ट्वेन्टी-20 विश्‍वचषकाची तयारी म्हणून बघत आहे. आशिया चषकानंतर आपल्याला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी 3 सामन्यांचा सराव असेल पण तो मायदेशातील खेळपट्ट्यांवर. यानंतर भारत पाकिस्तान विश्‍व चषकात एकमेकांसमोर 26 ऑक्टोबरला भिडतील. या पार्श्‍वभूमीवर भारतीय संघाने आपला विश्‍व चषकाचा संघ तयार ठेऊन आशिया चषक व पुढचे 6 सामने निव्वळ या संघाने सरावासाठी खेळायला पाहिजे होते. या अंतिम संघात जे प्रयोग करायचे आहेत ते अवश्य या सामन्यात करावेत पण अजून आपण विश्‍व चषकाच्या अंतिम संघापर्यंतच पोहोचायचेच प्रयोग करत आहोत.

आजचा सामना जरी हा भारत पाकिस्तान म्हणजे भावनिक सामना असला तरी विश्‍व चषकाच्या अंतिम संघाच्या द‍ृष्टीने हा सराव सामना म्हणून बघितले पाहिजे. भारताची फलंदाजी ही चिंतेची बाब नाही. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कोहली, राहुल, पंड्या, पंत आणि दिनेश कार्तिक ही फळी सक्षम आहे, पण बुमराहच्या अनुपस्थितीत गोलंदाजी कमजोर वाटते. आवेश खानच्या विरुद्ध हाँगकाँगने धावा कुटल्या. मुळात भुवनेश्‍वर कुमार हा आपला प्रमुख गोलंदाज हेच आपली गोलंदाजीतली कमकुवकता दाखवते.

भुवनेश्‍वर कुमारची ट्वेन्टी-20 सामन्यातील कामगिरी बघता 74 सामन्यात 22.46 च्या सरासरीने 6.90 च्या इकॉनॉमी रेटने 78 बळी मिळवले आहेत. 2021 सालच्या त्याच्या 22.25 च्या सरासरीपेक्षा त्याची 2022 ची सरासरी 15.88 असल्याने त्याचे कमबॅक वाटत आहे. ऑस्ट्रेलियन मैदानांवर आपल्याला स्विंगपेक्षा वेग महत्त्वाचा असेल. बुमराह, मोहम्मद सिराज, दीपक चहर ही मंडळी ऑस्ट्रेलियात उपयोगी ठरतील. यापैकी सिराज आणि चहरला आशिया चषकाच्या संघात स्थान दिले नाही. मुख्य म्हणजे विश्‍व चषकासाठी ट्वेन्टी-20 संघात पंड्या, अक्सर, हुडा सारखे अष्टपैलू गरजेचे असतील तेव्हा अश्‍विनचे संघातील स्थान काय? दुसर्‍या बाजूला पाकिस्तानच्या नवोदित नसीम शाहने आपली छाप पडली आहे.

दहानी, हसनैन आणि हसन अली यांच्यामुळे जलदगती मार्‍याला स्थैर्य आहे. मोहम्मद नवाझ आणि शादाब खानने हाँगकाँगला गुंडाळताना त्यांचा दबदबा प्रस्थापित केला आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताला आजचा सामना जिंकायला आणि एका उत्तम संघाविरुद्ध विश्‍व चषकाच्या तयारीचा सराव म्हणून गोलंदाजीवर विशेष भर द्यावा लागेल. पाकिस्तानच्या उत्तम फलंदाजीला रोखायला भुवनेश्‍वर कुमार, पंड्या, अर्शदीप, दीपक हुडा अक्सर, चहल हा आपला आजचा मारा असू शकतो.

ट्वेन्टी-20 हा फलंदाजांचा खेळ आहे पण या आशिया चषकाच्या संघात चहल, जडेजा (आता अक्सर), बिष्णोई, अश्‍विन, हुडा या 5 फिरकी गोलंदाजांचा समावेश आपण केला आहे आवेश, अर्शदीप आणि भुवनेश्‍वर हे प्रमुख जलदगती गोलंदाज आहेत. पंड्याने पाकिस्तनविरुद्ध तारले. आज नाणेफेक महत्त्वाची असेलच पण आपल्या या जलदगती मार्‍यातील असमतोलाचा फायदा उठवण्यावर पाकिस्तानचे लक्ष असेल. भारताने आशिया चषकासाठी पुढच्या विश्‍व चषकासाठीचा गोलंदाजीचा चमू पाठवणे जास्त श्रेयस्कर ठरले असते.

Back to top button