विटा पोलिसांच्या कारवाईत चार वेगवेगळ्या गुन्ह्यातील पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

विटा पोलिसांच्या कारवाईत चार वेगवेगळ्या गुन्ह्यातील पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

विटा,  पुढारी वृत्तसेवा : विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन संशयितांकडून वेगवेगळ्या चार गुन्ह्यातील एकूण ४ लाख ८५ हजारांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित नितीन हणमंत वायदंडे (वय २८,रा. ढालेवाडी), संतोष मारुती देशमुख (२१, रा. सावळज) आणि अशोक नामदेव चौगुले (२५, रा. सावळज ) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलतानगादे येथील नेताजी केशव जाधव यांच्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणच्या मोकळ्या जागेतून स्लॅबसाठी वापरण्यात येणा-या प्लेटांची चोरी करण्यात आली होती. नितीन वायदंडे, संतोष देशमुख आणि अशोक चौगुले यांनी पांढऱ्या महिंद्रा पिकअप मधून चोरून नेल्याची फिर्याद खानापूर येथील सेंट्रींग काम करणारे जाफर मुंजीब बेग (३२, रा. उडगणी) यांनी विटा पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महावीर कांबळे हे करीत आहेत. या गुन्ह्याचा तपास चालू असतानाच २५ ऑगस्ट रोजी खानापूर पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार संतोष घाडगे आणि रोहीत पाटील हे भिवघाट येथे गस्त घालत असताना रात्री सव्वा अकराच्या दरम्यान नितीन वायदंडे आणि संतोष देशमुख हे दोघे संशयितांना पकडण्यात आले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी गुणाची कबुली दिली. यावेळी त्यांच्याकडून संबंधित वापरलेली महिंद्रा गाडी जप्त करण्यात आली तसेच इतर मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. कडेगाव तालुक्यातील वांगी येथील घरफोडी केल्याचेही आरोपींनी यावेळी कबूल केले. शिवाय त्यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्याकडील अन्य एका गुन्ह्याचीही कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून एकूण चार लाख रुपये किमतीची गाडी आणि ८५ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य असा एकूण ४ लाख ८५ हजार ५०० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button