सांगली : म्हैसाळ जलसिंचन योजनेतील ६५ गावे तहानलेलीच | पुढारी

सांगली : म्हैसाळ जलसिंचन योजनेतील ६५ गावे तहानलेलीच

जत; विजय रूपनूर : लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना जत तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागाला वरदान ठरली आहे. तालुक्यातील सुमारे ३२ गावांना ही योजना नवसंजीवनी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचल्याने दुष्काळी भागातील चित्र बदलत असले तरी योजनेतील सुमारे ६५ गावे अजुनही तहानलेलीच आहेत.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा तालुक्यातील सुमारे ३२ गावांना लाभ झाला असून लाभक्षेत्रातील जमिनी ओलिताखाली आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या म्हैसाळ योजनेच्या आवर्तनामुळे तालुक्यातील अनेक बंधारे, नाले, मातीनाला बांध, पाझर तलाव, साठवण तलाव या जलस्रोतात पावसाळ्यापूर्वीच पुरेसा पाणीसाठा आहे. मार्च-एप्रिल महिन्यात विहीर व बोअर मधील पाण्याची कमतरता भासत असताना वेळेत आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे पुरेसे पाणी उपलब्ध होत असताना दुसरीकडे पाणी योजनेपासून वंचित असलेली ६५ गावे तहानलेली आहेत. बंदिस्त पाईपलाईन द्वारे उमदी पर्यंत पाणी पोहोचले असले तरी या योजनेचे दहा टक्के काम अपूर्ण आहे. बंदिस्त पाइपलाइनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचावे या हेतूने १०० कोटींची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विस्तारित पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर काम सुरू करण्याची मागणी होत आहे.

…या गावांना योजना ठरली वरदान

या योजनांचा तालुक्यातील हिवरे, वायफळ , मोकाशेवाडी , आवडी , धावडवाडी, डफळापुर, बाज, शेगाव, बिरनाळ, कुंभारी, बागेवाडी, प्रतापूर, तिप्पेहळी रेवनाळ, बनाळी, सनमडी, घोलेश्वर, खैराव, टोणेवाडी या लाभक्षेत्रातील गावांना पुरेसा लाभ झाला आहे. याचबरोबर सांगोला तालुक्यातील सांगोला वितरकेद्वारे हंगिरगे, पारे, घेरडी, हबिसेवाडी, डिस्कळ, नराळे या गावांना पाणी दिले आहे. तसेच सद्यस्थितीला मुख्य मंगळवेढा वितरकेद्वारे आवर्तन सुरू आहे. मंगळवेढा तालुक्यातील, रेवेवाडी, महमदाबाद, लोणार, मारोळी, हन्नूर यासह इतर गावांना लाभ होत आहे.

ऊस क्षेत्र व बागायत क्षेत्र वाढले

दरवर्षी म्हैसाळचे उन्हाळी आवर्तन सुरू होत असल्याची शाश्वती शेतकऱ्यांना झाल्याने उन्हाळ्यात पाणी मिळणार असे गृहीत धरून शेकडो हेक्टर ऊस लागवड केली आहे. भाजीपाला व फळ बागा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. यावर्षी तालुक्यातून ऊस तोडणीसाठी जाणारा ऊसतोड मजुरास तालुक्यातच रोजगार मिळणार आहे. तालुक्यातील तिप्पेहळळी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालला आहे. ऊसाचे क्षेत्र वाढल्याने प्रस्तावित डफळापूर येथील साखर कारखाना या वर्षी पूर्ण क्षमतेने चालणार आहे.

पाणीपट्टी वसुलीला प्रतिसाद कमी

यावर्षी उन्हाळी आवर्तना मध्ये योजनेअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या तालुक्यात कर वसुली दोन कोटी 30 लाख इतकी आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी प्रतिसाद कमी आहे. तीस लाख इतकी रक्कम लाभधारकांनी भरले आहे. उर्वरित कर त्वरित भरावा असे आवाहन म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना विभागाने केले आहे.

गतवर्षी झालेल्या पर्जन्यमानामुळे व म्हैसाळ योजनेच्या पाणी उपलब्धतेमुळे ऊस व बागायत क्षेत्र वाढले आहे. तालुक्याला सुरुवातीच्या काळात दुष्काळ पाचवीला पुजलेला होता. येथील अनेक शेतकरी आपली रोजीरोटी चालवण्यासाठी ऊसतोडीसाठी जायचे. परंतु आज कृष्णा कॅनॉलच्या माध्यमातून इथली शेती फुलली आहे. त्यामुळेच ऊस तोडी साठी जाणारे मजूर आज आपल्या शेतामध्येे ऊस लावून स्वाभिमानाने जगत आहेत. कृष्णा नदीच्या पाण्याने इथले संपूर्ण चित्र बदलत आहे.
– मच्छिंद्र खिलारे, माजी उपसरपंच येळवी.

हेही वाचलंत का ? 

Back to top button