Sanjay Patil v/s Anil Babar : भानगडी बाहेर काढण्याचा ‘काकां’चा इशारा | पुढारी

Sanjay Patil v/s Anil Babar : भानगडी बाहेर काढण्याचा 'काकां'चा इशारा

दिघंची : पुढारी वृत्तसेवा : तुमची नौटंकी बंद करा, नाहीतर आम्ही तुमच्या सर्व भानगडी बाहेर काढू, असा इशारा सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील  (Sanjay Patil v/s Anil Babar) यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना दिला. सांगली जिल्ह्यातील दिघंची (ता. आटपाडी) येथे आयोजित जल जीवन मिशन योजनेच्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

खासदार पाटील (Sanjay Patil v/s Anil Babar) म्हणाले की, भाजपचे नेते, जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना त्यांनी टेंभू योजनेसाठी १ हजार २०० कोटींचा निधी आणला होता. परंतु, त्याचे त्यांनी कधी श्रेय घेतले नाही. जल जीवन मिशन ही योजना केंद्र शासनाची संकल्पना आहे. या योजनेसाठी मी व अमरसिंह देशमुख यांनी पाठपुरावा केला आहे. राजकारणात आपण ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. त्यामुळे राजकारण मर्यादेपर्यंत करा, थ्री डायमेन्शन आतापर्यंत होते. मात्र, तुमची भूमिका ही सेव्हन डायमेन्शन सारखी आहे, अशी टीकाही खासदार पाटील यांनी आमदार बाबर यांच्यावर यावेळी केली.

अमरसिंह देशमुख म्हणाले की, धनगाव पाणी योजनेला आमदार अनिल बाबर यांनी खोडा घातला. धनगाव योजनेचे जनक तुम्हीच व्हा. पण पाणी योजना सुरू करा. आम्ही तुम्हाला मते देऊन आमदार केले. मात्र, तुम्ही आमच्यावरच घाव घातला. आमदारांना मतदारसंघात काम करण्याची चांगली संधी होती. मात्र, आता वेगळया पध्दतीने काम केले जात आहे.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, भाजपचे नेते जयवंत सरगर, जि. प. सदस्य मोहन रणदिवे, अरुण बालटे, जनार्धन झिबळ, ज्येष्ठ नेते भगवान मोरे, बळवंतराव मोरे, युवा नेते अमोल काटकर, अंकुश भोसले, सोपान काळे, चंद्रकांत पुसावले, अजित मोरे, बंडू मोरे, हरिदास पवार आदी उपस्थित होते.

युवा नेते शहाजी यादव, केशव मिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रणव गुरव यांनी प्रास्तविक व स्वागत केले. बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सावंता पुसावळे यांनी आभार मानले.

मंत्री जयंत पाटील यांनी मोठे काम केले

या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे जाहीर आभार मानले. आटपाडी तालुक्यातील वंचित असणाऱ्या गावांचा टेंभू योजनेत सहभागी करून त्यांनी फार मोठे काम केले आहे, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button