सिध्दू मुसेवाला हत्येतील संशयित महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश कांबळेला अटक | पुढारी

सिध्दू मुसेवाला हत्येतील संशयित महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश कांबळेला अटक

मंचर : पुढारी वृत्तसेवा

पंजाब येथील प्रसिद्ध गायक सिध्दु मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी संशयित असलेल्या महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश कांबळे यास नगर जिल्ह्यातील संगमनेर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याची माहिती मंचरचे ठाणेदार सतीश होडगर यांनी दिली.

होडगर म्हणाले की, मंचर पोलिस ठाण्यात मोक्कातंर्गत संतोष सुनील जाधव याच्यावर गुन्हा दाखल होता. त्याने त्याच्या साथीदारासह ओंकार उर्फ राण्या बाणखेले याचा पिस्टलमधून गोळीबार करून खून केल्याबाबत हा गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार संतोष जाधव यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी अटक वारंट काढले होते. यावेळी फरार असताना महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश कांबळे याने त्यास आश्रय दिला आहे, अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.

शेतात खत नेण्याची शेतकर्‍यांची लगबग

त्यामुळे संगमनेर येथून महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश कांबळे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, गुन्हा शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेतले. मोका न्यायालय शिवाजी नगर येथे बुधवारी ८ रोजी त्याला हजर केले असता सोमवार २० जून पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

दरम्यान पंजाब येथील गायक सिध्दू मुसेवला यांच्या हत्याकांडामध्ये महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश कांबळे याच्यावर संशय असल्याने पंजाब येथील पोलीस पुण्यामध्ये येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Back to top button