Rajya Sabha Election Live : शिवसेनेच्या ‘पवारांचा’ मार्ग खडतर? आव्हाड, ठाकूर, कांदे यांचे मत बाद ठरणार?

Rajya Sabha Election Live : शिवसेनेच्या ‘पवारांचा’ मार्ग खडतर? आव्हाड, ठाकूर, कांदे यांचे मत बाद ठरणार?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rajya Sabha Election 2022 Live : राज्यसभेच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेळापत्रकानुसार मतमोजणीची प्रक्रिया सुरु होणार होती, मात्र त्याच वेळी भाजपने मतदानाच्या प्रक्रियेवर घेतलेले आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाने नोंदवून घेतले आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतांवर भाजपचे नेते आशिष शेलार आणि आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला होता. या तिघांचे मत बाद करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. परंतु राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपचा आक्षेप फेटाळला. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजपने तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेण्यात आली. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी थांबवली आहे. दरम्यान, तीन मते बाद झाल्यास महाविकास आघाडीचा मार्ग खडतर होईल अशी चर्चा सुरू आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारी मतदान झाले. सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाची वेळ ४ पर्यंत होती. पण त्यापूर्वीच बहुतांश आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभेसाठी एकूण २८५ आमदारांनी मतदान केले.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना न्यायालयाने परवानगी नाकारल्याने त्यांना राज्यसभेसाठी मतदान करता आले नाही. एमआयएमने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. तर काँग्रेसने आपल्या उमेदवाराला ४२ मते तर दोन मते शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना दिली. यामुळे संजय पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच आमचा विजय निश्चित असल्याचे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडी आणि भाजपकडे पुरेशी मते नाहीत. त्यामुळे दोघांची मदार छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर आहे. या निवडणुकीत अपक्षांची मते निर्णायक ठरणार असल्याने त्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ दिसून आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news