

इस्लामपुर पुढारी वृत्तसेवा : इस्लामपुरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना परदेशातून व्हॉट्स ॲप मेसेजद्वारे धमकी देण्यात आली आहे. याबाबत पोलीसांत तक्रार करुनही दीड महिन्यात काहीच तपास झालेला नाही. यामागे असणाऱ्या सूत्रधाराचा पोलीसांनी शोध घ्यावा. अन्यथा न्यायालयात दाद मागून यामागे असणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष धर्यशील मोरे व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत दिला.
मोरे म्हणाले, नगराध्यक्ष पाटील यांची लोकप्रियता वाढत असल्यामुळे विरोधक सैरभैर झाले आहेत. यातून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्नही फसत चालल्याने या़ंना काही दिवसापूर्वी परदेशातून सोशल मीडियावरुन धमकी देणारा मेसेज आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबद्दलही अपशब्द वापरण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांत तक्रार करुनही पोलिसांनी त्या व्यक्तिचा शोध घेतलेला नाही. पालिका निवडणुकीत झालेला पराभव पचनी न पडल्याने हाॅस्पिटलमध्ये सेवा देणार्या डाॅक्टर्स, सहकारी स्टाफ यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन बदनाम करणे, हाॅस्पिटलची सातत्याने राज्य शासनाच्या सरकारी अधिकार्यांना पुढे करुन चाैकशी लावून नाहक त्रास देणे सुरु आहे.
यातुन काही निष्पन्न होईना म्हणून परदेशातील व्हाटस् अॅ नंबर वरून थेट धमकी देणे. असे विकृत राजकारण सुरु आहेत. असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी मधुकर हुबाले, चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, संदिप सावंत, दादासाहेब रसाळ आदी उपस्थित होते.