अनिल बाबर : मिरवण्यापेक्षा पाण्यासाठी आमदारकी सार्थकी लागल्याचे समाधान | पुढारी

अनिल बाबर : मिरवण्यापेक्षा पाण्यासाठी आमदारकी सार्थकी लागल्याचे समाधान

आटपाडी : पुढारी वृत्तसेवा : टेंभू योजनेच्या विस्तारित सहाव्या टप्प्यासाठी ८ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. पाण्याबाबत सर्व्हे आणि पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्यामुळे चार तालुक्यातील ३८ गावचे क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी माहिती देऊन मिरवण्यासाठी नाही, तर पाण्यासाठी आमदारकी सार्थकी लागल्याचे समाधान आहे, अशी भावना आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केली. जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, सरपंच अमोल मोरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, सोमनाथ गायकवाड, साहेबराव पाटील, बाळासाहेब होनराव यांच्या उपस्थितीत आमदार बाबर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

आमदार बाबर म्हणाले की, आमदार होणं माझं ध्येय नाही. मी माझ्या मतदारसंघाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न केला. दुष्काळाचा कलंक पुसण्याचे सामर्थ्य आणि समाधान मला मिळाले, हे मी माझं भाग्यच समजतो. वंचित गावांसाठी टेंभूची विस्तारित योजना आणि सहावा टप्पा जन्माला घातला. त्यामुळे मतदारसंघातील सर्व गावांना पाणी मिळणार आहे. टेंभूसाठी वंचित गावासाठी कोयनेतून ८ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. खानापूर तालुक्यातील ११, आटपाडी तालुक्यातील १२, तासगाव तालुक्यातील ७ आणि सांगोला तालुक्यातील ८ गावांना हे पाणी मिळणार आहे. पाण्याची कायदेशीर उपलब्धता आता झाली आहे. आराखडा बनवण्याचे काम सुरू होईल आणि त्यानंतर निधी आणि निविदा प्रक्रिया सुरू होईल. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांच्या सोबत २७ ऑक्टोबर रोजी बैठक घेतली. तत्कालीन मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन पाणी उपलब्धतेची मान्यता मिळवून घेतली आहे. पक्ष कोणताही असला, तरी मी माझी आमदारकी जनतेला पाणी देण्यासाठी पणाला लावली, असे ते म्हणाले.

‘या’ गावांना लाभ होणार

१)आटपाडी- गोळुवाडी, विभूतवाडी, तरसवाडी, पुजारवाडी, पांढरेवाडी, उंबरगाव, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी, राजेवाडी, लींगीवरे, पिंपरी बुद्रुक आणि कुरुंदवाडी.

२) सांगोला- चिणके, बलवडी, आजनाळे, लिगाडेस्ती, लोटेवाडी, खवासपूर आणि मानेगाव.

आमदार बाबर यांनी टेंभूचे पाणी आटपाडी तालुक्यात आणल्यानंतर विरोधकांनी घाटमाथ्यावर पाणी नेऊन दाखवण्याचे आव्हान दिले होते. घाटमाथ्यावर विद्युत पंपाशिवाय बंद पाइपलाइनने हे पाणी आमदार बाबर यांनी नेऊन दाखवले. आता विरोधकांकडे पाण्याचा मुद्दाच राहिला नसल्याची टीका तानाजीराव पाटील यांनी विरोधकांवर यावेळी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button