राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट | पुढारी

राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट

शिराळा ः पुढारी वृत्तसेवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. सातपुते यांनी 28 एप्रिल रोजी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे, अशी माहिती अ‍ॅड. रवी पाटील यांनी मंगळवारी दिली.

सन 2008 मध्ये भारतीय रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता.

शिराळा तालुका मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले होते. यामुळे तानाजी सावंत यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये संशयित क्र. नऊ म्हणून राज ठाकरे व तत्कालीन मनसेचे नेते शिरीष पारकर यांना संशयित क्र. दहा म्हणून सह आरोपी करण्यात आले होते.

राज ठाकरे हे यापूर्वीच्या तीन आणि 28 एप्रिल 2022 या चार तारखांना न्यायालयात गैरहजर राहिले आहेत.शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात 2008 मध्ये वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल राज ठाकरे व शिरीष पारकर यांच्याविरुद्ध यापूर्वी देखील वॉरंट काढण्यात आले होते. तत्कालीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किरण माने यांनी सन 2014 मध्ये या दोघांकडून जामीन स्वीकारून सदरचे वॉरंट रद्द केले होते.

राज्य शासनाकडून राजकीय आंदोलनातील अनेक गुन्हे मागे घेण्यात आले होते. हा देखील गुन्हा मागे घेतला जाईल, अशी अपेक्षा होती. याबाबत राज ठाकरे यांच्या पातळीवर देखील प्रयत्न करण्यात आले होते. परंतु अद्यापही हा खटला कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून या खटल्यामध्ये कोणीही आरोपी न्यायालयात फिरकले नव्हते. म्हणून डिसेंबर 2021 मध्ये सर्व दहा संशयितांविरोधात न्यायालयाने वॉरंटचा हुकूम काढला होता.

पहिल्या आठ संशयितांनी जानेवारी 2022 मध्ये न्यायालयात अर्ज करून वॉरंट हुकूम रद्द करून घेतला होता. परंतु राज ठाकरे व शिरीष पारकर हे पोलिसांनी वॉरंट बजावून देखील न्यायालयात हजर राहत नाहीत. म्हणून दि. 18 जानेवारी 2022 रोजी मुंबई पोलिस आयुक्तांनी या दोघांना का अटक केली नाही, अशी कारणे दाखवा नोटीस न्यायालयाने आयुक्तांना बजावली आहे, अशी माहिती संशयितांचे वकील रवी पाटील यांनी दिली.

‘या’ कलमांतर्गत राज ठाकरेंसह दहाजणांवर खटला सुरू

शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील आंदोलनप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, शिरीष पारकर यांच्यासह दहाजणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे, अशा विविध आरोपांखाली खटला दाखल करण्यात आला होता. भादंविच्या कलम 143, 109, 117 अन्वये तसेच मुंबई पोलिस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचलतं का?

Back to top button