सांगली जिल्ह्यातील एकही गाव जलसिंचनापासून वंचित राहणार नाही : जयंत पाटील | पुढारी

सांगली जिल्ह्यातील एकही गाव जलसिंचनापासून वंचित राहणार नाही : जयंत पाटील

सांगली : पुढारी वृत्तसेवा : ‘आपले सरकार’ असल्याची भावना निर्माण करण्यात राज्य शासन यशस्वी झाले आहे. सांगली जिल्हा हा
कृषीप्रधान जिल्हा आहे,  जिल्ह्यातील कोणतेही गाव जलसिंचनापासून वंचित राहू नये, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. प्रत्येकाने आपली सद्सदविवेक बुध्दी जागृत ठेवून सामाजिक एकोपा प्राणपणाने जपावा, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनी मुख्य शासकीय समारंभात पोलीस परेड ग्राऊंड सांगली येथे पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महापौर दिग्वीजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पाटबंधारे विभागामार्फत पूरसंरक्षक भिंत बांधकाम, पूररेषा निश्चितीकरणाची कामे, विशेष दुरूस्तीची कामे करण्यात येत आहेत. खानापूर, आटपाडी, तासगाव, जत येथे टेंभूचे क्षेत्र वाढविण्याला आपण प्राधान्य दिले आहे. सध्या सुरू असलेल्या उपसा सिंचन योजनेचे विद्युत देयके मोठ्या रक्कमेची येत असल्याने या योजना किफायतशीरपणे चालू राहण्यासाठी या योजना सौर उर्जावर चालवण्याचे नियोजन केले आहे. जलसंपदा विभागातील १४ हजार रिक्त जागा येत्या तीन वर्षात टप्याटप्याने भरल्या जातील. कवठेपिराण, उरण इस्लामपूर, आष्टा, कसबे डिग्रज व बोरगाव या गावांतील क्षारपड जमीन विकासासाठी ९३ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी ८० टक्के निधी शासन व २० टक्के निधी शेतकऱ्यांनी द्यावयाचा आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत द्राक्ष, केळी, ड्रॅगनफ्रुट, ॲव्होकॅडो या पिकांचा समावेश केला असून या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा.

गुणवंतांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्हा उद्योग पुरस्कारासाठी निवड झालेल्या इस्लामपूर येथील मे. व्यास एंटरप्रायजेसच्या मालक योगिता माळी, कुंडल येथील मे. राजनिलक इंडस्टीज चे मालक सचिन लाड यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पाटील यांच्या हस्ते महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयदादा कडणे आणि पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button