तासगाव तहसिल कार्यालय: सेवानिवृत्त लिपिक लाच घेताना पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

तासगाव तहसिल कार्यालय: सेवानिवृत्त लिपिक लाच घेताना पोलिसांच्या जाळ्यात

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : तासगाव तहसिल कार्यालय मधील सेवानिवृत्त लिपिक पाच हजार रुपयांची लाच घेताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

वाळूचा ट्रॅक्टर सोडविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करुन देण्यासाठी मध्यस्थामार्फत ५ हजार रुपयांची लाच घेणारा तासगाव तहसिलदार कार्यालयातील सेवानिवृत्त लिपिक खंडू ज्ञानदेव निकम (रा. चिंचणी)  मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.

खंडू निकम याने शहरातील एका दुकानात ५ हजार रुपये ठेवायला सांगितले होते. या दुकानातील गणेश पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, अवैध वाळू उपसा आणि वाहतूक केलेप्रकरणी तक्रारदाराचा ट्रॅक्टर काही दिवसांपूर्वी पकडण्यात आला होता. हा ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी तहसिल कार्यालयात आणून लावला होता. तहसिलदार कल्पना ढवळे यांनी संबंधितास नियमाप्रमाणे दंड केला होता.

तहसिलदारांनी ठोठावलेला दंड तक्रारदाराने भरला. आपला ट्रॅक्टर तहसिलदार कार्यालयातून सोडवून नेण्यासाठी अनेकदा हेलपाटेही मारले. हा ट्रॅक्टर सोडण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार करुन देण्यासाठी खंडू निकमने ५ हजार रुपये मागितले होते.

यानंतर सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन याबाबत तक्रार करण्यात आली. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पडताळणी केली.

त्यामध्ये खंडू निकमने पाच हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. या तक्रारदारास पाच हजार घेऊन खंडू निकम यांच्याकडे पाठविण्यात आले. परंतू खंडू निकमने स्वत: पैसे स्विकारले नाहीत. शहरातील एका दुकानात पैसे ठेवायला सांगितले.

मंगळवारी तक्रारदारासह दुकानात सापळा लावला. खंडू निकम याच्या सांगण्यावरुन पैसे घेताना दुकानातील गणेश पाटील याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी खंडू निकम आणि गणेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा :

सेवानिवृत्ती नंतरही लिपीक वर्षभर तहसिलमध्ये ठाण मांडून

दरम्यान, गेल्या वर्षी सेवानिवृत्त झालेला तहसिल कार्यालयातील चिंचणी (ता. तासगाव) येथील खंडू निकम हा लिपिक अद्यापही गौण खनिज विभागात कार्यरत होता.

वरिष्ठ अधिका-याची मर्जी असल्याने सेवानिवृत्त होऊन एक वर्ष झाल्यानंतरही टेबल सोडले नव्हते. गौणखनीज प्रकरणातील खंडू निकमच करीत होता. अवैध वाळू, मुरुमउपसा प्रकरणी केलेल्या कारवायांची कागदपत्रे तयार करणे, नोटीसा बजावणे तसेच सबंधितांकडून खुलासे घेणे ही कामे खंडू निकम करीत होता.

निवृत्त झाल्यानंतरही त्याच्याकडे गौणखनिजच्या टेबलची जबाबदारी होती, याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Back to top button