सांगली : ‘तासगाव’ची 44 कोटींची साखर परस्पर विकली | पुढारी

सांगली : ‘तासगाव’ची 44 कोटींची साखर परस्पर विकली

सांगली ः पुढारी वृत्तसेवा साखर आयुक्तांनी शेतकर्‍यांची ऊसबिले देण्यासाठी सुमारे 44 कोटी रुपयांची एक लाख 44 हजार क्विंटल साखरेवर आरआरसी केली असतानाही ती परस्पर विकली गेल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार संशयास्पद आहे, असा आरोप काँग्रेसचे ओबीसी सेल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. विवेेक गुरव, किसान सेलचे पदाधिकार जोतीराम जाधव व शेतकर्‍यांनी पत्रकार परिषदेत केला.

डॉ. गुरव व जाधव म्हणाले, तासगाव कारखान्यात सन 2020-21 च्या गळीत हंगामात एक लाख 14 हजार 575 टन उसाचे गाळप केले. साखर उत्पादन एक लाख 59 हजार क्विंटल झाले. साखर उतारा 10.70 टक्के आहे. कारखान्याची एफआरपी 2500 रुपये आहे. काही शेतकर्‍यांचे बिल कारखान्याने दिले आहे. पण हजारो शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपये देणे थकीत राहिले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी साखर आयुक्त यांच्याकडे तक्रार केली. यामुळे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखरेवर आरआरसी केली.

साखर गोदाम सील करून ती ताब्यात ठेवण्याचे आदेश तालुका प्रशासनाला दिले. पण तालुका प्रशासनाने जप्त साखरेचा लिलाव केला नाही. या दरम्यान कारखान्याने एक लाख 44 हजार क्किंटल साखरेची परस्पर विक्री केली. या साखरेची आजच्या बाजारभावाप्रमाणे 44 कोटी रुपये किंमत होतेे. यातील रक्कम शेतकर्‍यांना बिलापोटी देणे बंधनकारक होते. पण ती दिली गेली नाही. अद्यापही तासगाव कारखाना शेतकर्‍यांचे सुमारे 18 कोटी रुपये देणे बाकी आहे.

ते पुढे म्हणाले, याबरोबरच या कारखान्याच्या मालकाने एसजीझेड अ‍ॅन्ड एसजीए शुगर्सने नागेवाडी येथील यशवंत शुगर हा कारखाना भाड्याने चालविण्यास घेतला होता. या कारखान्यानेही शेतकर्‍यांची बिले थकीत ठेवली.त्यामुळे साखर आयुक्तांनी या कारखान्यात उत्पादित झालेली 49 हजार 265 क्विंटल साखर जप्त करून लिलाव करण्याचे आदेश दिले. त्यानुसार खानापूर तहसीलदार यांनी 3100 रुपये दराने या साखरेची विक्री करून 15 कोटी रूपये सरकारी खात्यात जमा करून ठेवले आहेत. यातून या कारखान्यास ऊस गेलेल्या शेतकर्‍यांचे पाच कोटी रुपये द्यावेत, व उर्वरित नऊ कोटी रुपये तासगावच्या शेतकर्‍यांना द्यावेत, अशी आमची मागणी आहे.

तासगावकडे शिल्लक राहिलेले नऊ कोटी देण्यासाठी सध्या तासगावकडे चार कोटीची असलेली साखर विकावी. त्यांनी पुढे सांगितले की, याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अन्यथा गुरुवार, दि. 28 रोजी तासगाव तहसीलसमोर शेतकरी आत्मदहन करतील. यावेळी राजेंद्र मोरे, संजय पाटील, प्रकाश शिंदे, शुभम पाटील, विजय वाघ, विजय चव्हाण, अभिजित पाटील, साईराज पाटील, संतोष बुदावले व शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचलतं का?

Back to top button