सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील सांगली शहर पोलिस ठाण्यातील सफाई कर्मचारी अतुल विकास गर्जे-पाटील (वय 36, रा. जुनी पोलिस लाईनजवळ, बदाम चौक) यांनी महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. मंगळवारी भरदिवसा त्यांनी पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या टेरेसवर विषारी द्रव प्राशन केले. सुवर्णा माणिक पाटील (रा. महादेव मंदिरजवळ, शामरावनगर) असे या महिला सावकाराचे नाव आहे. अतुल पाटील यांच्या मृतदेहाजवळ सावकार सुवर्णा पाटील हिच्या विरोधात लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी ः अतुल पाटील हे येथील शहर पोलिस ठाण्यात गेल्या काही वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून काम करीत होते. साफ-सफाई करण्याबरोबर अधिकार्यांना चहा-पाणी देणे इत्यादी कामे करीत होते. शांत आणि मनमिळावू अशी त्यांची कर्मचार्यांमध्ये ओळख होती. काही महिन्यांपूर्वी सावकार सुवर्णा पाटील हिच्याकडून त्यांनी व्याजाने काही रक्कम घेतली होती. त्या बदल्यात अतुल यांनी कोरे धनादेश आणि स्टॅम्प दिले होते. पैसे न दिल्याने पाटील हिने अतुल यांनी दिलेला धनादेश बँकेत टाकला, तो वटला नाही. त्यामुळे पाटील हिने धनादेश न वटल्याबाबतची तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन न्यायालयात सुनावणी सुरु होती.
सोमवारीच या सुनावणीसाठी अतुल हे न्यायालयात गेले होते. सकाळपासून ते तणावात असल्याचे पोलिसांनी जाणवत होते. दुपारी एकपासून त्यांचा मोबाईल बंद लागत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास अतुल यांचा मृतदेह टेरेसवर असल्याचा आढळून आला. जवळच विषारी द्रव्याची बाटली पडलेली होती. त्यांना तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.
चिठ्ठीत सावकारीतून त्रासाचा उल्लेख
पोलिसांना अतुल यांच्याकडे चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये त्यांनी सावकार सुवर्णा पाटील हिच्यापासून होत असलेल्या त्रासाचा उल्लेख केला आहे. त्याशिवाय माझ्या मुलींची काळजी घ्या. त्यांच्याकडे लक्ष द्या, असे लिहिले आहे.