डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : सदाभाऊ खोत यांनी जे तमाशातील पात्राशी माझी तुलना केली त्यावर मी बोलणं खर तर टाळलं होत. कारण सदाभाऊ खोत स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवतात. त्यामुळे माझ्या सारख्या शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीवर असा आरोप करणे आणि मी त्यांना प्रतिक्रिया देणे हे मला योग्य वाटत नाही. परंतू त्यांची अवस्था भाजपच्या फडात तुणतुणं हाती घेऊन वावरणाऱ्या पात्रासारखी झाली आहे. एका सामजिक कामासाठी आमदार अमोल मिटकरी डोंबिवलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सदावर्ते यांच्यासांदर्भात विचारले असता त्यांना जामीन मिळाला हे मला आत्ता समजलं. त्यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. मात्र जर न्यायलयाने त्यांना जामीन दिला असेल तर न्यायालयाचा मान आपण राखला पाहिजे असे सांगितले.
राणा दांपत्यासंदर्भात बोलताना महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचे सुप्त कारस्थान सध्या भाजपकडून सुरू आहे अशी टीका त्यांनी केली. खारघर पोलीस ठाण्यात राणा यांना पाणी दिल्याचा व्हिडिओ नवी मुंबईचे आयुक्त पांडे यांनी ट्विट केला. राणा दाम्पत्य म्हणतेय की मी दलित आहे, मला वागणूक चांगली मिळत नाही हे धांदात खोटं आहे.
गृहमंत्र्यांनी पण सांगितलं की इतर कैद्यांना जशी व्यवस्थित वागणूक दिली जाते तशीच वागणूक त्यांना देण्यात आली. त्यांनी जाती संदर्भातील कागदपत्र खोटी सादर केली आहेत त्यामुळे ॲट्रॉसिटी आणि अनुसूचित जाती संदर्भात त्यांनी बोलू नये. यासंदर्भात त्यांना न्यायालयाने फटकारले आहे.
भाजपचे षडयंत्र फसलं असून ते जे काही बोलतात ते विरोधाभास आहे. कन्यादान आणि ब्राह्मण समाजाचा निषेध या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळले.