सातारा : महाराष्ट्र दिनी यशवंतराव मोहिते पतसंस्थेविरोधात आंदोलनाचा इशारा | पुढारी

सातारा : महाराष्ट्र दिनी यशवंतराव मोहिते पतसंस्थेविरोधात आंदोलनाचा इशारा

कराड : पुढारी वृत्तसेवा
रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेकडून सातारा व सांगली जिल्ह्यातील हजारो ठेवीदार शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे दिले जात नाहीत. मुदत संपलेल्या ठेवीसुद्धा ठेवीदारांना परत केल्या जात नाहीत. म्हणून पतसंस्थेचे संस्थापक डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या निवासस्थासमोर महाराष्ट्र दिनी ठेवीदारांसह धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनीही शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा त्यांच्या निवासस्थानी आंदोलन करू असा इशाराही यावेळी पत्रकार परिषदेत दिला.

या वेळी पंजाबराव पाटील म्‍हणाले, ” डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्याकडे पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. यासंदर्भात सातारा जिल्हा निबंधक आणि जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुखांकडेही पाठपुरावा केला आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे संचालक मंडळांवर गुन्हा दाखल करून ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत करण्याची व्यवस्था करण्यात यावी”.

या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी (१ मे) कराडमधील डॉ.इंद्रजीत मोहिते यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे, बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलत का ?

Back to top button