सांगली : सहा लाखाची लाच मागणारा तलाठी अटकेत | पुढारी

सांगली : सहा लाखाची लाच मागणारा तलाठी अटकेत

सांगली : पुढारी वृत्तसेवा
वडिलार्जित शेतजमिनीच्या सातबारा उतार्‍यावरील चुकीची नोंद रद्द करून देण्याकरीता सहा लाख रुपयाची लाचेची मागणी करणारा विकास ऊर्फ राजू तातोबा गुरव (वय 54, रा. कामेरी, ता. वाळवा) या तलाठ्यास अटक केली आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी : फाळकेवाडी येथील तक्रारदार यांच्या वडिलार्जित शेतजमिनीच्या सातबारा उतार्‍यावर चुकीची नोंद झाली आहे. ती दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदार हे तलाठी गुरव याच्याकडे गेले. त्यावर त्याने सहा लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास माहिती दिली. त्यानुसार 9 डिसेंबर 2021 रोजी तक्रार केली होती. तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 9, 10, 19, 17, 23, 24, 30 डिसेंबर आणि 3 जानेवारी रोजी पडताळणी केली. तेव्हा तलाठी याने सातबारावरील चुकीची दुरूस्ती करण्यासाठी सहा लाख रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, तलाठी गुरव याला कारवाईबाबत शंका आल्यामुळे त्याने लाच स्वीकारली नाही. त्यामुळे त्याने लाच मागितल्याबद्दलचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयास सादर केला होता. त्यांनी अहवालानुसार गुरव याच्यावर लाच मागितल्याबद्दल कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरूदत्त मोरे, अविनाश सागर, संजय संकपाळ, प्रितम चौगुले, अजित पाटील यांच्या पथकाने गुरव याला ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध इस्लामपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिराने गुन्हा दाखल केला.

तक्रारदार यांची पोलिस ठाण्यातही तक्रार

जमिनी उतार्‍यावरील दुरुस्तीसाठी तलाठी गुरव हे दाद देत नसल्याने आणि पैशाची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यातही तक्रार दिली आहे. त्यामुळे गुरव याला संशय आला. त्यामुळे त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र त्याने मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button