इस्लामाबाद ; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याकडून स्वत:चे आसन वाचविण्याची केविलवाणी धडपड सुरू झाली आहे. त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर नॅशनल असेम्ब्लीत (संसद) गुरुवार (31 मार्च) पासून चर्चा सुरू होणार होती. मात्र, ती सुरू होण्याआधीच संसदेचे विशेष अधिवेशन स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. आता 3 एप्रिलला अविश्वास ठरावावर थेट मतदान होणार आहे.
दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, अविश्वास ठराव मागे घेण्यासाठी इम्रान खान यांनी विरोधकांसमोर संसद बरखास्त करण्याचा पर्याय ठेवला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियन नवाज यांनी, इम्रान खान (Imran Khan) हे देशाचे आरोपी आहेत.
त्यांना कोणत्याही परिस्थितीत पळून जाण्याची संधी देणार नाही, असा इशारा दिला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी इम्रान खान यांनी सन्मानाने आसन सोडावे. त्यांची त्यासाठी तयारी नसेल; तर अविश्वास ठरावाला सामोरे जावे, असे आव्हान दिले आहे.
पाकचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे सरकार अल्पमतात आहे. इम्रान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचा पाठिंबा चौधरी आसिम नाजीर आणि मोहम्मद अस्लम भुटानी यांनी याआधी काढून घेतला. पाठोपाठ मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान (एमक्यूएम-पी) या पक्षाने बुधवारी पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे इम्रान खान यांची गच्छंती होण्याची शक्यता बळावली आहे.
या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी नवा डाव टाकला आहे. अविश्वास ठरावाचा सामना करण्याऐवजी गुरुवारी संसदेचे विशेष अधिवेशनच स्थगित केल्याची घोषणा केली असून, या ठरावावर 3 एप्रिलला मतदान घेण्याची घोषणा केली आहे.