रशिया -युक्रेन युद्ध : डॉलरला शह देण्यासाठी रशियाची खेळी, रुबलचा घातला थेट सोन्याशीच मेळ | पुढारी

रशिया -युक्रेन युद्ध : डॉलरला शह देण्यासाठी रशियाची खेळी, रुबलचा घातला थेट सोन्याशीच मेळ

मॉस्को ; वृत्तसंस्था : अमेरिकेच्या शक्तिशाली डॉलरला शह देणे आणि आपले चलन भक्कम करणे अशा दुहेरी हेतूने रशियाच्या मध्यवर्ती बँकेने रुबल या चलनाला थेट सोन्याशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक ग्रॅम सोन्याची किंमत पाच हजार रुबल अशी निश्चित करण्यात आली आहे. (रशिया युक्रेन युद्ध)

रशिया हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा उत्पादक देश आहे. तसेच त्या देशात इंधनाचेही साठे मोठ्या प्रमाणात आहेत.

नैसर्गिक वायू आणि जीवाश्म इंधन म्हणजेच कच्च्या तेलाची विक्री रशिया जगातील विविध देशांना करत आला आहे.

रशिया -युक्रेन युद्ध : एक तर रुबल किंवा तेवढ्या रकमेचे सोने चुकते करा

आता ज्या देशांना रशियाकडून नैसर्गिक वायू किंवा कच्चे तेल खरेदी करायचे आहे, त्यांना त्यासाठी एक तर रुबल किंवा तेवढ्या रकमेचे सोने चुकते करावे लागेल. त्यामुळे या सगळ्या व्यवहारांमध्ये डॉलरचा कुठेही संबंध येणार नाही. सध्या अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लावले आहेत. त्याचा फटका रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसू लागला आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी रशियाच्या मध्यवर्ती बँकेने (सेंट्रल बँक ऑफ रशिया) रुबलला सोन्याशी जोडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. अर्थात, या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने केल्या जाणार आहेत. रशियाने तूर्त येत्या 30 जूनपर्यंत 5 हजार रुबलला एक ग्रॅम सोने असा दर निश्चित केला आहे.

रुबल हे रशियन चलन जागतिक पातळीवर भक्कम होत जाणार असून, रशियाला त्याचा मोठा फायदा होईल. रशियाने यापुढील काळात युरोपीय समुदायातील देशांना नैसर्गिक वायू अथवा कच्चे तेल खरेदी करण्यासाठी फक्त रुबल अथवा सोन्याद्वारेच व्यवहार करण्यास सांगितले आहे. आम्ही कोणत्याही स्थितीत डॉलर किंवा युरो स्वीकारणार नाही, असेही रशियाने संबंधित देशांना बजावले आहे.

रशिया -युक्रेन युद्ध : पुतीन यांचा मास्टर स्ट्रोक!

रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांनी रुबलला सोन्याशी जोडण्याची जी खेळी केली आहे ती अतिशय चाणाक्ष म्हटली पाहिजे. सध्या एका डॉलरसाठी रशियाला सुमारे शंभर रुबल मोजावे लागत आहेत.

मात्र, नजीकच्या भविष्यात रशियाला रुबल अथवा सोने देऊनच नैसर्गिक वायू किंवा कच्चे तेल खरेदी करावे लागणार असल्यामुळे डॉलर आणि युरो यांचे जागतिक बाजारातील महत्त्व वेगाने कमी होऊ शकेल. यातून अमेरिका आणि युरोपातील उद्योगसंपन्न देशांची जागतिक बाजारावरील पकडदेखील सैल होऊ शकेल. एक प्रकारे पुतीन यांचा हा मास्टर स्ट्रोकच आहे.

…तर रशियाला प्रचंड फायदा

रशियाची ही योजना यशस्वी झाली, तर त्याचा प्रचंड फायदा त्या देशाला आगामी काळात होऊ शकतो. शिवाय, रशियाकडून नैसर्गिक वायू अथवा कच्चे तेल खरेदी करणे अन्य देशांसाठी सुलभ होईल. यातून रशियाकडील सुवर्णसाठा वाढत जाईल. म्हणजेच पर्यायाने सोन्याच्या जागतिक बाजारातदेखील रशियाची दादागिरी चालेल. तथापि, या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाते, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.

तूर्त रशियाने डॉलरला शह देऊन आपले चलन मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. सध्या रशियाचा रुबल जागतिक पातळीवर कोसळला आहे. एका रुबलची किंमत भारतीय चलनात 92 पैसे झाली आहे. त्याच्या उलट एका डॉलरचे मूल्य 75.89 भारतीय रुपये, तर युरोचे मूल्य 84 भारतीय रुपये असे आहे.

रुबल आणखी कोसळू नये यासाठी रशियाने आपले चलन सोन्याशी जोडले आहे. यातून जगभरात रुबलला जास्तीत जास्त पसंती मिळू शकते. यापूर्वी लीबीयाचे सर्वेसर्वा कर्नल मुअम्मर गद्दाफी यांनी असा प्रयोग केला होता. तथापि, त्यापूर्वीच संतप्त जनतेने त्यांचा बळी घेतला.

Back to top button