जागतिक चिमणी दिन विशेष : या चिमण्यांनो परत फिरा रे..! | पुढारी

जागतिक चिमणी दिन विशेष : या चिमण्यांनो परत फिरा रे..!

वारणावती (आष्पाक आत्तार) : वाढते शहरीकरण, वाढते प्रदूषण, रासायनिक खतांचा अतिवापर, शिकार, नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, अशा एक ना अनेक कारणांनी आज पक्षी नामशेष होताना दिसत आहेत. अंगणात सतत बागडणारी, जिचं नाव घेऊन बाळाला आई बालपणी घास भरवायची ती चिऊताई अर्थात चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली आहे. पर्यावरणामध्ये या प्राणी पक्षांसह चिमण्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. नामशेष होणारी चिमणी आधुनिक युगात टिकावी तिचे संरक्षण व जागृती व्हावी, या उद्देशाने २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्ताने…

या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या’ या ग. दि. माडगूळकरां च्या गीताची आज आठवण झाल्यावाचून राहत नाही. आज प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. मात्र, अलीकडे काळाच्या ओघात ती दिसेनाशी झाली आहे. बालपणी जिच्या चिवचिवाटाने सकाळ व्हायची, त्या चिमण्या आज दृष्टीस पडणेच दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे आता केवळ कविता, बडबडगीते यातच चिमणी शिल्लक राहते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात चिमण्या मोठ्या प्रमाणात आढळून येत होत्या. अन्न बिया, भात, गहू, बाजरी हे चिमण्यांचं प्रमुख खाद्य शहरात अल्पप्रमाणात चिमण्यांना उपलब्ध होते. तर ग्रामीण भागातील महिला धान्य निवडताना चिमण्यांना ते खायला टाकायच्या, त्यामुळे प्रत्येकाच्या अंगणात या चिमण्या हजेरी लावायच्या अलीकडे अंगणात धान्य निवडणाऱ्या महिला दिसत नाही. परिणामी अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी चिमणी गायब झाली आहे.

आधुनिक युगात मातीच्या भिंती कौलारू घरे यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जंगल तोड होऊ लागली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांच्या संख्येस कारणीभूत ठरत आहे. निसर्ग साखळीत पर्यावरणाच्या समतोलासाठी चिमण्यांचं संवर्धन करणे काळाची गरज आहे. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आज बरेच पक्षी मित्र व संस्था काम करत आहेत. पक्षांविषयी असणारी अंधश्रद्धा गैरसमज या संस्था व पक्षीमित्र दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मानवाप्रमाणे पशुपक्ष्यांना ही निसर्गाने जगण्याचा अधिकार दिला आहे. वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार या पक्षांना संरक्षण देण्यात आले आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, पर्यावरण वाचले तर पक्षी वाचतील. त्यामुळे आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या बागेत, परिसरात, घराजवळ जर पाणी व त्यांच्या धान्याची सोय केली. तर खऱ्या अर्थाने हा जागतिक चिमणी दिन साजरा झाला, असे म्हणता येईल. शिवाय नामशेष होऊ लागलेल्या या चिमण्या आपल्याला पुन्हा दिसू लागतील.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

Back to top button