कोल्हापूर पोलीस दलातील आणखी एक सहाय्यक फौजदार लाचखोरीच्या जाळ्यात | पुढारी

कोल्हापूर पोलीस दलातील आणखी एक सहाय्यक फौजदार लाचखोरीच्या जाळ्यात

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : अवैद्य धंद्यावरील छापा कारवाईनंतर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना कोल्हापूर पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. नेसरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक विठ्ठल पाटील (वय ५१, राहणार नेसरी) यांना लाचलुचपत प्रतिबंध पथकाने आज (दि.१९) शनिवारी दुपारी पकडले

गेल्या दोन महिन्यात एसीबीने लाचखोरप्रकरणी रंगेहाथ पकडलेल्या पोलिसांची संख्या चार झाली. शनिवार दुपारी लाचखोरी प्रकरणी आणखी एकाला अटक झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. एसीबीचे कोल्हापूर पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नेसरी येथील तक्रारदार व्यक्तीचे अवैध व्यवसाय असल्याची माहिती मिळाल्याने नेसरी पोलिसांनी शुक्रवारी त्याच्यावर छापा टाकून कारवाई केली. त्यानंतर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी संबंधित सहायक फौजदार पुंडलिक पाटील यांनी तक्रारदारकडे पाच हजार रुपयाची मागणी केली होती.

त्यानुसार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. आज दुपारी रक्कम स्वीकारत असताना पथकाने पुंडलिक पाटील यांना रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे नेसरी चंदगड परिसरात खळबळ उडाली आहे.संशयित पुंडलिक पाटील याने तक्रारदार व्यक्तीला पाच हजाराची रक्कम घेऊन नेसरी पोलीस ठाण्यात बोलाविले होते रक्कम स्वीकारत असताना पाटील यांना पोलीस ठाण्यातच एसीबी पथकाने रंगेहाथ पकडल्याने काही क्षणात पोलीस ठाण्यासह आवारात सन्नाटा पसरला होता

Back to top button