जीवन विम्याच्या पेन्शन योजना, जाणून घ्या अधिक

जीवन विम्याच्या पेन्शन योजना, जाणून घ्या अधिक
Published on
Updated on

एखादा व्यक्ती निवृत्तीच्या वयात पोहोचल्यानंतर म्हणजेच वयाची साठी गाठल्यानंतर त्याचे उत्पन्नाचे एकमेव साधन हे पेन्शन राहते. त्यामुळे विमा कंपन्यांनी जीवन विमाच्या श्रेणीत पेन्शन प्लॅननादेखील (Life Insurance Pension Plan) स्थान दिले आहे. यासंदर्भात जाणून घेऊ.

प्रत्यक्षात जीवन विमा पेन्शन योजना (Life Insurance Pension Plan) ही प्रामुख्याने पेन्शनची सोय नसलेल्या लोकांसाठी तयार केलेली आहे. असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक उद्योगांतील कर्मचार्‍यांना पेन्शनची सुविधा दिली जात नाही. या क्षेत्राशी निगडित लोकांसाठी ही योजना खूपच उपयुक्त आहे.

पेन्शन प्लॅन घेताना असेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) कंपनीकडून गेल्या आर्थिक वर्षातील भरपाई आणि दावे निकाली काढण्याची कामगिरी जाणून घेणे आवश्यक आहे. पेन्शन प्लॅनसंदर्भातील माहिती संकेतस्थळ, एजंट, कंपनीची शाखा या तीन स्रोतांकडून मिळू शकते. याशिवाय विमा सल्लागार किंवा एजंटकडून दिली जाणारी माहिती आपले ध्येय किंवा गरजेनुसार आहे की नाही, याचीदेखील पडताळणी करायला हवी.

हप्त्याचे आकलन

या प्लॅनचा हप्ता हा अन्य जीवन विमा प्लॅनच्या हप्त्याप्रमाणेच राहतो. जीवन विमा योजनेप्रमाणेच या योजनेच्या हप्त्याचे काही निकष निश्चित केले आहेत. यात पॉलिसीधारकाचे वय, त्याची आरोग्य स्थिती, योजनेचा कालावधी, हप्ता भरण्याचा प्रकार म्हणजेच मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक, एकल हप्ता याचा समावेश आहे. यातील एकल हप्त्याचा विचार करता एलआयसीच्या योजनेमध्ये 40 वर्षांच्या व्यक्तीने 10 लाख रुपये एकत्रित भरल्यास त्या व्यक्तीला वर्षाकाठी 50,250 रुपये पेन्शन मिळू शकते.

भरपाई कशी मिळते?

पेन्शन जीवन विमा योजनेतील भरपाई ही अन्य पॉलिसीप्रमाणेच असते. योजनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत अनेक नियम आणि अटींचे पालन करावे लागते. यानुसार कालावधी पूर्ण झाल्यानंतर काही रकमेची भरपाई एकरकमी केली जाते आणि उर्वरित रक्कम ही ठरावीक काळात पेन्शन रूपाने मासिक, तिमाही, सहामाही, वार्षिक याप्रमाणे मिळते. याशिवाय जर विमाधारकाला सर्व रक्कम हवी असेल तर त्याला ही सुविधादेखील मिळू शकते.

पेन्शन मिळवण्याच्या काळात विमाधारकाचे निधन झाले तर पेन्शन तत्काळ थांबविली जाते आणि नॉमिनीकडून औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार त्याला पेन्शन प्रदान केली जाते. जॉईंट लाईफ पेन्शन योजनेत विमाधारक/जोडीदार यापैकी एक जोपर्यंत हयात राहतो, तोपर्यंत पेन्शन योजनेचे लाभ मिळत राहतात. दोघेही नसतील तर त्यांच्या कायदेशीर वारसास किंवा नॉमिनी केलेल्या व्यक्तीस पेन्शन मिळत राहील.

सर्व पेन्शन प्लॅनमध्ये लॉक इन पीरियड पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी जमा करण्याची तरतूद असते किंवा नियमानुसार कर्ज देखील मिळते. या योजनेनुसार प्रत्येक विमाधारकाला ही सुविधा मिळत राहते. पेन्शन जीवन विमा प्लॅन आकर्षक करण्यासाठी विविध कंपन्यांकडून युलिपच्या माध्यमातून गॅरंटी देय पेन्शन योजनादेखील राबविली जाते. ही योजना खरेदी करताना प्रस्तावकास योजनेशी संबंधित नियम आणि अटींची पूर्ण माहिती मिळवणे खूप आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news