सातारा : आम्ही बोलल्यावर सपशेल माघार का घेता? | पुढारी

सातारा : आम्ही बोलल्यावर सपशेल माघार का घेता?

सातारा  पुढारी वृत्तसेवा: खा. उदयनराजे बोलल्यावर मला उत्तर देणे भाग आहे. उदयनराजेंनी टीका केल्यानंतर अजिंक्यतारा साखर कारखाना व माझे नाव बातम्यांमध्ये येत असताना त्यांनी का खुलासा केला नाही? मग आम्ही बोलल्यावर मी त्यांचे नाव घेतले नाही, असे म्हणत सपशेल माघार का घेता? असा सवाल आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. श्री. छ. उदयनराजे यांना उद्देशून पत्रकार परिषदेत उपस्थित केला. ग्रेड सेपरेटरमध्ये दुहेरी वाहतूक ही त्यांची संकल्पना काय आहे माहीत नाही पण ग्रेडसेपरेटर सातारकरांच्या उपयोगाचा व्हावा, अशी कोपरखळीही

आ. शिवेंद्रराजे यांनी मारली.

कारखान्याचे आणि कुठल्याही आमदाराचे नाव घेतले नसताना आ. शिवेंद्रराजेंनी अंगावर ओढवून का घेतले, अशी टिप्पणी खा. उदयनराजेंनी केली होती. याबाबत विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, अजिंक्यतारा कारखाना आणि माझे नाव सतत बातम्यांमध्ये येत असताना खा. उदयनराजेंनी त्यावेळी का खुलासा केला नाही? संध्याकाळी मी दिलेली प्रतिक्रिया झोंबल्यावर मी कुणाचे नाव घेतले नव्हते, असे पत्रक काढणे म्हणजे त्यांनी सपशेल माघार घेतल्याचे स्पष्ट आहे.

मी स्वत:हून त्यांच्यावर बोलत नाही. पण ते बोलले तर मला उत्तर देणे भाग आहे. बोलताना त्यांनी विचार करावा, असा इशाराही आ. शिवेंद्रराजे यांनी दिला.

सातारा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि नविआमध्ये काही ठरले आहे का? असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, निवडणुका जाहीर होतात की नाहीत, हा अधांतरी विषय आहे. मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील व पदाधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली होती. मात्र काही ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा शहराच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे का? असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, युडीकडून निधी उपलब्ध होणार आहे. कास धरणाला पूर्वीच 42 कोटी मिळाले आहेत. प्रशासकीय इमारतीसाठी 10 कोटी राज्य शासनाने दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रेड सेपरेटरमधून दुहेरी वाहतूक करण्याची भूमिका खा. उदयनराजे यांची घेतली आहे, असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, त्यांची नवी संकल्पना काय आहे माहित नाही. त्यांच्या संकल्पनेतून भुयारी मार्ग झाला. दुहेरी वाहतूक शक्य आहे की नाही हे वाहतूक शाखा व सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवावे.

ग्रेड सेपरेटर सातारकरांच्या उपयोगाचा व्हावा असे वाटते. सध्या ग्रेड सेपरेटरचा सातारकरांना फार उपयोग होतोय असे दिसत नाही. शहराकडून बसस्थानकाकडे जाणारा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा असता तर वापर वाढला असता अशी लोकांची मते आहेत. पैसे खर्च केल्यासारखे भुयारी मार्गाचा सातारकरांना उपयोग व्हावा, असे त्यांनी सांगितले.

Back to top button